विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने केली सुखरूप सुटका.

सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा) हळदा येथील शेतकरी हिम्मत भाऊराव गवळे यांचे गट क्र. १७६ मधील खोदकाम चालू असलेल्या विहिरीत बिबट पडल्याची माहिती वनविभागास कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. दोडके, वनपाल एच.एच.सय्यद, वनपाल टी. झेड खातीब, वनपाल डी. एस. सोनार यांचे सह वनरक्षक अशोक दांडगे, प्रवीण गवळी, श्रीमती तेजस्विनी लेनेकर, श्रीमती सविता सोनुने हे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची पाहणी केली असता विहीर ४० फुट खोल असल्याचे निदर्शनास आले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी श्रीमती सुवर्णा माने उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांना देवून मदतीसाठी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या मध्ये घरीसिंग घुसिंगे, प्रकाश सूर्यवंशी, मैनोद्दिन शेख, आशिष जोशी, मनोज गायकवाड, अजिंठा वनविभागाचे कर्मचारी एस.एस.चाथे, जे. आर. दाडगे, व्ही. एस. देवकर, वाय. एस. बोखारे, जी. डी. दांडगे, योगेश शिंदे यांनी परिश्रम घेत बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. श्रीमती सुवर्णा माने उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. आर. दोडके यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन केले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. बी. मात्रे यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बिबट्यास नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले.



