महाराष्ट्र

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत शहरात सुरु असलेल्या मलनि: सारण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेबाबत खुलासा.

त्वरीत सुरु होणार मुख्य रस्त्यांचे बांधकाम.

चंद्रपूर दि. १६ (वृत्तसेवा) चंद्रपूर शहरात केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत मंजुर झालेली मलनि:सारण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बांधणीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार असल्याने या रस्त्यांशी निगडीत मलनि:सारणची पाईपलाईन व पिण्याच्या  पाण्याची जलवाहिनी टाकण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आलेली आहे. मात्र सुरु असलेल्या या अत्यावश्यक कामांबाबत काही घटकांद्वारे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय तांत्रिक समितीद्वारे तपासुनच प्रकल्पाला मंजुरी – शासन परिपत्रक क्र. अमृत – २०२२ / प्र. क्र. २०३ / नवि – ३३. दि. १६/०९/२०२२ अन्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची निवड केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणुन करण्यात आली व त्यांच्याद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपूर यांचेकडुन अंदाजपत्रकास व प्रस्तावास तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात येऊन राज्यस्तरीय बैठकीमध्ये अधिक्षक अभियंता, सीपीडीएम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांचे उपस्थितीत प्रस्तावास आवश्यक मंजुरी प्रदान करण्यात आली. मलनि:सारण तसेच पाणी पुरवठा प्रकल्पाची शासन स्तरावरुन योग्य छानणी व तपासणी करुनच मान्यता प्रदान केलेली आहे.

जुन्या भूमिगत गटार योजनेचा पुढील टप्पा अमृत २.० योजनेत घेण्यात आला आहे – चंद्रपूर शहरात या आधी ७८.९३ कोटी रुपयांची कामे मलनि:सारण योजने अंतर्गत करण्यात आलेली आहे. त्या प्रस्तावामध्ये शहरात १४१ कि. मी. मलनि:सारण पाईपलाईन टाकणे व २५ आणि ४५ दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन सांडपाणी प्रक्रीया केंद्राचे बांधकाम करण्यात आलेले आहे. यामधे सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन व त्याची घरजोडणी शहराच्या उर्वरित काही भागात टाकण्यात न आल्याने ती कामे करण्यास अमृत २.० अभियान अंतर्गत ५४२.०५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामध्ये शहरात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या मलनिस्सारण पाईपलाईनचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार आजपावेतो १७ कि. मी. मलनि:सारण पाईपलाईनची चाचणी करण्यात आली असुन त्या वापर करण्यायोग्य आढळुन आलेल्या आहे. तसेच उर्वरित पाईपलाईनचा सुध्दा वापर केला जाणार आहे. त्यामुळे जुनी योजना निरुपयोगी झाली किंवा जुन्या भुमीगत गटार योजनेतील निधीचा अपव्यय झाल्याचा भ्रम जो पसरविण्यात येत आहे तो चुकीचा असल्याचे सिद्ध होते.

पाणी पुरवठा योजना आणि मलनि:सारण योजना हे शहराकरीता मुलभुत प्रकल्प – देशामध्ये शहरीकरण वाढत असल्याने चंद्रपूर शहराचा सुध्दा विस्तार होत आहे, सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या ही ४.५ लक्ष पेक्षा जास्त आहे. सबब केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेत शहराची वाढीव पाणी पुरवठा व मलनि:सारणाची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाव्दारे सर्व बाजुने तांत्रिक तपासणी करुन प्रकल्प मंजुर करण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजना व मलनि:सारण योजना पूर्ण असलेल्या शहरांनाच इतर विकास कामासाठी निधी दिला जातो.

अमृत २.० योजनेत मंजुर पाणी पुरवठा योजना ही अमृत १.० योजनेची पुरक व वाढीव योजना – अमृत १.० अंतर्गत शहरात पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली त्यात ८ नविन टाक्या व वितरण व्यवस्थेचा मुख्यतः समावेश होता. त्यानुसार कामे करण्यात आली. परंतु शहराकरिता उपलब्ध पाणी साठा कमी असल्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रीया करून पुनर्वापर करीताचा प्रकल्प पुर्ण झाल्यामुळे पाणी महाऔष्णीक केंद्राला देण्यात येत आहे व त्याबदल्यात अतिरीक्त पाणी उपलब्ध झाल्यामुळे सदर पाण्याची उचल व प्रक्रीया करण्याकरीता नविन जलशुध्दीकरण व इतर काही अनुषंगीक कामाकरीता २७०.१३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला व त्यास मान्यता घेवुन कामे प्रगतीपथावर आहे. त्यामुळे मंजुर प्रकल्प किंमतीनुसार व आराखड्यानुसारच कामे करण्यात येत आहे

*अमृत १.० च्या कंत्राटदाराने अर्धवट कामे केली या आरोपांबाबतन – अमृत १.० योजनेत कंत्राटदाराने केलेल्याच कामाचे देयके महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व्दारा प्रस्तावित केल्याप्रमाणे महानगरपालिकेने अदा केली आहे. कुठल्याही न केलेल्या कामाचे देयक अदा झालेले नाही. तसेच कंत्राटदाराचे १५ कोटी रुपयाचे देयके थांबविण्यात आले असुन ती रक्कम दंड स्वरुपात राखुन ठेवलेली आहे. अमृत १.० योजनेत मंजुर पाईपलाईन पेक्षा १०० कि.मी. अधिक पाईपलाईन नवीन वस्तीमध्ये टाकण्यात आली आहे तसेच अमृत १.० योजना सुरु झाल्यावर नव्याने लागु झालेल्या जीएसटीमुळे २८ कोटी अतिरीक्त भार महानगरपालिकेवर पडल्याने पाणीपुरवठा योजनेत बाधीत रस्ते दुरुस्तीसाठी निधी शिल्लक राहीला नाही. सदर दुरुस्तीचे काम अमृत २.० योजने अंतर्गत केले जाणार आहे.

*अमृत २.० मलनि:सारण योजनेतील कंत्राटदाराला जास्त दराने कंत्राट दिले याबाबत खुलासा – मलनि:सारण योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व शासन व्दारे निश्चित नियमाप्रमाणे निविदा राबवण्यात येवून पात्र निविदा दराची तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केल्यावर निविदा उघडण्यात आल्या व त्या राज्य शासनाच्या उच्च स्तरीय समीती मंजुरीला पाठवण्यात आल्या होत्या. अमृत २.० योजने अंतर्गत प्राप्त निविदादारांनी १८.१० टक्के जास्त दराने निविदा टाकली होती. दर ज्यास्त असल्याने मनपाद्वारे कंत्राटदारास दरात तडजोड करण्यास सांगण्यात आले. तडजोडीनंतर ९.९० टक्के दरावर काम करण्याची कंत्राटदाराने तयारी दर्शवल्याने, राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीनेच दरास मान्यता देण्यात आली आहे.
चंद्रपूर शहर औद्योगीक शहर असल्याने शहरातील नागरीकांना उत्तम मुलभुत सोयी निर्माण करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेतुन विकास कामे करण्यास महानगरपालिका कटिबध्द आहे. अमृत २.० योजने अंतर्गत अनेक जुन्या महानगरपालिकांना सुध्दा बाढीव पाणीपुरवठा व वाढीव मलनिस्सारण योजना व जुन्या योजनेची क्षमता वाढविण्याच्या प्रकल्पांना शासनाने मंजुरी दिली आहे.
   सदर कामे पुर्ण होताच लगेच रस्ता बांधणीच्या कामाला सुरवात करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. काही घटकांद्वारे भ्रम पसरवुन शासनाच्या विकास प्रकल्पांबाबत नागरीकांना चुकीची माहिती दिली जात आहे. तरी शहरातील नागरीकांनी या अफवांना बळी न पडता विकास प्रकल्पांना साथ दयावी व शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button