आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत सोयगावात आज महारक्तदान शिबिर.

सोयगाव दि. १६ (प्रतिनिधी) जगदगुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत आज दि. १६ जानेवारी रोजी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी व रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन श्रीगुरुदेव संप्रदाय सोयगाव तालुका समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जगदगुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. ०४ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत १५ दिवस चालणाऱ्या महाकुंभ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून गरजू व गंभीर रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा सामाजिक व मानवतावादी उपक्रम संस्थेतर्फे सातत्याने राबविला जात आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सोयगाव ग्रामीण रुग्णालय येथे श्रीगुरुदेव संप्रदाय सोयगाव तालुका समितीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, तरुणांनी पुढाकार घेऊन या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या शिबिरामुळे सोयगाव शहरासह परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.

गेल्या वर्षभरात सोयगाव शहर व परिसरातील तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रक्ताची अत्यंत आवश्यकता असलेल्या ८८ रुग्णांना श्रीगुरुदेव संप्रदाय समिती, सोयगाव तालुका यांच्या वतीने विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्यात आले होते.

Related Articles

Back to top button