क्राईम

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या पत्राला पोलिस प्रशासनाकडून तिलांजली.

सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवर असतांना तालुक्यातील वडगाव तिगजी येथे दि. २२ जानेवारी रोजी दहा टायरी डंपर एम. एच.- १८ बी. जी. ५२७७ च्या चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डंपर मध्ये वाळू (गौनखनिज) असल्याने तहसीलदार सोयगाव यांना आपल्या स्तरावरून कारवाई करणे संबंधी दि. ०३ फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात आले व याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा पत्राद्वारे माहिती देण्यात आली. दहा टायरी डंपर असल्याने त्यात सहा ब्रास वाळू होती. डंपर मालकास जास्त दंड होऊ नये म्हणून ठाण्यातच डंपर मधील एक ते दीड ब्रास वाळू डंपर मधून खाली करण्यात आली. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना डंपर चा काटा न करता ओव्हर लोडचा दंड आकारता आला नाही. दरम्यान चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चा तपास अधिकारी यांनी तपास करीत असताना चालकाची व मालक यांची माहिती काढून तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक असतांना त्यांनी माहिती दिली नसल्याने तहसीलदार यांना दंडात्मक कारवाई करता आली नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे पोलिसांनीच जाणीवपूर्वक वाळू माफियांशी संगनमत करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यास मदत केली असल्याची चर्चा सद्या जोर धरत आहे. दरम्यान पोलीस ठाणे सोयगाव यांनी दि. ०३ फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रावरून पोलीस ठाण्यातील डंपर च्या मागे खाली टाकण्यात आलेल्या वाळूला वगळून तलाठी शंकर देवतुले यांनी दि. ०७ फेब्रुवारी रोजी पाच ब्रास वाळूचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसिल कार्यालयात सादर केला. तलाठी यांच्या अहवालाचा संदर्भ देत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले त्यात नमूद करण्यात आले की, वाळू वाहतूक करणारे डंपर आपण कोणत्या तारखेस जमा केले, सदर वाहन मालकाचे नाव आपण सांगितले नसून चालकाचे नाव कळविले असून सदर व्यक्ती कोणत्या गावाची आहे याचा बोध होत नाही. व सदर वाहन आपण कोणत्या तारखेस पकडले त्याचे सुद्धा आपण पत्रात उल्लेख केलेला नाही. सदर प्रकरणी जप्त वाहन मालकाचे नाव व गाव तसेच सदर वाहन कोणत्या तारखेस पकडले याबाबत ची माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावे जेणेकरून सदर वाहन मालकास ०५ ब्रास अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दंडात्मक नोटीस सादर करणे सोयीचे होईल व शासकीय महसूल रक्कम चलन द्वारे शासन खाती जमा करणे योग्य होईल दंड रक्कम वसूल होई पर्यंत सदर वाहन आपले अभिरक्षत ठेवावे असे पत्रात नमूद करण्यात आले असतांना देखील सोयगाव पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करून तालुका दंडाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवीत दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान डंपर सोडून दिल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. यातील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची ग्रामीण पोलीस अधिक्षक त्यांच्या स्तरावरून चौकशी करून काय कारवाई करतात की नाही याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर महसूल विभागाकडून कारवाई संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button