सोयगाव तालुक्याला नेतृत्वाची संधी द्या; जिल्हा परिषद अध्यक्षपदी पुष्पा काळे यांना संधीची मागणी.
दीर्घकाळापासून प्रलंबित विकास अनुशेष भरून काढण्यासाठी नागरिकांची अपेक्षा; भाजप–शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला वेग.

सोयगाव दि. ०५ (प्रतिनिधी) – सोयगाव तालुक्याचा विकास वेगाने व्हावा आणि दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेला विकास अनुशेष भरून निघावा, यासाठी आमखेडा गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊन तालुक्याला न्याय द्यावा, अशी मागणी सोयगाव तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
सोयगाव तालुका हा सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचा भाग असून या मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात सोयगाव तालुक्याला नेतृत्वाच्या संधी मर्यादित प्रमाणात मिळाल्याची भावना अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे. १९९९ साली सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातून लोकमहर्षी कै. बाबुरावजी काळे यांचे सुपुत्र रंगनाथराव काळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर पालोदकर हे मैदानात होते. या तिरंगी लढतीत रंगनाथराव काळे यांचा पराभव झाला असला तरी त्यांना काही काळासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र सोयगाव तालुक्याला जिल्हा पातळीवर प्रभावी नेतृत्वाची मोठी संधी मिळालेली नाही, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.
दरम्यान, तालुक्यातील अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमधील अडचणी, औषधांचा तुटवडा, तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमिअभिलेख, वन विभाग आणि पाटबंधारे विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची समस्या कायम आहे. अनेक कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नसल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रारही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) युतीची सत्ता असली तरी सिल्लोड–सोयगाव मतदारसंघात स्थानिक पातळीवर काही राजकीय मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून तालुक्याला सक्षम नेतृत्व मिळावे आणि विकासाच्या कामांना गती मिळावी, यासाठी आमखेडा गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांना अध्यक्षपदाची संधी देण्याची मागणी पुढे येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, पुष्पा काळे या सक्रिय आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून उदयास येत असून त्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाऊ शकते. ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आणि प्रशासनाला गती देण्यासाठी त्यांचे नेतृत्व उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सोयगाव तालुक्याला नेतृत्वाची संधी देत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुष्पा काळे यांच्या नावाचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
अध्यक्षपदाबाबत राजकीय चर्चेला वेग
जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत सोयगाव तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळावी आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी पुष्पा काळे यांना अध्यक्षपद देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. मात्र या संदर्भातील अंतिम निर्णय काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



