विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा फज्जा.
सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघातच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची दुरवस्था.

१०-११ महिन्यांचे वाहनभाडे थकल्याने पथकाचे वाहन बंद.
छत्रपती संभाजीनगर दि. १७ (वृत्तसेवा) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर गंभीर परिणाम झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाहनधारकांचे तब्बल १० ते ११ महिन्यांचे भाडे थकल्याने जिल्हा परिषद फर्दापूर गटातील सावळदबारा पथकाचे वाहन आर्थिक विवंचनेमुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी खोळंबली असून पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सोयगाव-सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार तसेच फर्दापूर जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या सदस्या महीम मुलतानी यांच्या कार्यक्षेत्रात ही परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यात सत्ताधारी पक्षांचे प्रतिनिधित्व असूनही विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा कार्यक्रम आर्थिक कारणांमुळे ठप्प होणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी एकूण ४२ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. त्यापैकी १७ पथकांसाठी लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पथकांद्वारे ग्रामीण भागातील अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, संबंधित संस्थेकडून वाहनधारकांना अनेक महिन्यांपासून भाड्याचा मोबदला न मिळाल्याने वाहनधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. वाहनांचे मासिक हप्ते, दुरुस्तीचा खर्च, विमा, कागदपत्रे, इंधन खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाल्याने काही वाहनधारकांनी वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर होत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे काम ठप्प झाले आहे. सोयगाव तालुक्यात या कार्यक्रमासाठी दोन वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. त्यापैकी सावळदबारा पथकाचे वाहन बंद झाल्याने अनेक गावांतील अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची नियोजित आरोग्य तपासणी रखडली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत तपासणीच बंद पडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित वाहनधारकांचे १० ते ११ महिन्यांचे लाखो रुपयांचे भाडे थकीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केवळ सोयगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे वाहनधारकांचे किती कोटी रुपयांचे देयक प्रलंबित असेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहनधारकांची थकीत बिले अदा करावीत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरळीत सुरू करावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आता आरोग्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकरणाची कितपत दखल घेतात आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा मार्ग मोकळा करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



