दिवाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांचा ओघ वाढला; एसटी बस ठासून भरल्या!
५० टक्के सवलतीचा फायदा – पण प्रवास जीवघेणा! ग्रामीण भागात एसटी बस अपुऱ्या!

सोयगाव दि. २७ (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारची महिला सन्मान योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरत असली, तरी या योजनेमुळे प्रवाशांची वाढलेली संख्या आणि अपुऱ्या एसटी बससेवेचा ताण सध्या सोयगाव परिसरात जाणवू लागला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जात असल्याने महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दरम्यान, दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी वाढल्याने सोयगाव आगारातून धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये अक्षरशः ठासून प्रवास सुरू आहे. अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या ९० ते ११० पर्यंत पोहोचत असून, प्रवाशांना चालकाच्या केबिनमध्ये बसूनही प्रवास करावा लागत आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ग्रामीण भागात एसटीच्या गाड्या मर्यादित असल्याने नागरिकांना या जीवघेण्या परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे. “मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आणि भाचे यांनाही आज अशा परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे,” अशा शब्दांत काही प्रवाशांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सोयगाव बसस्थानकावर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे एसटी महामंडळाचा हमाल नसल्याने प्रवाशांना स्वतःच आपले सामान उतरवावे लागत आहे. काही प्रवाशांनी वाहकांकडूनही सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सर्व घटनांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून, “आगार प्रमुख आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.



