आपला जिल्हाराजकीय

सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – मा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दौरा.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) तालुक्यातील घोसला बोरमाळ, तिडका, नांदगाव, नांदगाव तांडा, निमखेडी आदी गावांमध्ये सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतांमध्ये नद्या निर्माण होऊन उभी पिके वाहून गेली, सुपीक माती खडकापर्यंत वाहून गेली तर काही ठिकाणी शेतकरी बांधवांचे जनावरांसह ट्रॅक्टर देखील पाण्यात वाहून गेले. या भीषण परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांची प्रचंड हाल-अपेष्टा सुरू झाल्या आहेत.

या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादासजी दानवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख राजु राठोड, आमदार उदयसिंग राजपुत, उपजिल्हा प्रमुख विठ्ठल बदर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दिलीप मचे, तसेच स्थानिक पदाधिकारी संजय मोटे, रामेश्वर काळे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दानवे यांनी शेतकरी बांधवांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली. शेतकरी बांधवांच्या व्यथा ऐकून घेताना त्यांनी सांगितले की, “शेतकरी बांधवांनी खचून जाण्याची गरज नाही. आज तुम्हाला मोठे संकट आले आहे, पण या संकटाच्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आम्ही शासनाकडे तातडीने मागणी करणार आहोत. शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू.”

या भेटीत शेतकरी बांधवांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली. अचानक आलेल्या या पुरामुळे गाई, म्हशी, शेळ्या, बैल आदी जनावरे वाहून गेल्याने केवळ पिकेच नव्हे तर पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दोनहरी संकटे ओढवली आहेत.

या नैसर्गिक संकटात शेतकरी बांधव एकटे नाहीत, त्यांच्या पाठिशी पक्ष तसेच स्थानिक नेतृत्व उभे आहे, असे आश्वासन यावेळी अंबादास दानवे यांनी दिले.

शेअर करा.

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका.