क्राईममहाराष्ट्र

फर्दापूर परिसरात बेकायदेशीर लाकूड जळतंय; वन विभागाची नजरचूक की दुर्लक्ष?

विट भट्ट्यांमध्ये विना परवाना लाकडाचा सर्रास वापर असल्याचा आरोप तक्रारीनंतरही कारवाई नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह.

सिल्लोड दि. ०५ (प्रतिनिधी) अजिंठा वनपरिक्षेत्र (प्रा.) अंतर्गत येणाऱ्या सोयगाव तालुक्यातील धनवट, फर्दापूर व सावळदबारा परिसरातील विट भट्ट्यांमध्ये जळणासाठी विना परवाना मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात असून वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने वनसंपदेवर मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील धनवट, फर्दापूर व सावळदबारा हा परिसर अजिंठा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येतो. या भागात मोठ्या प्रमाणावर विट भट्ट्या सुरू असून त्यामध्ये विटा भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड जाळले जात आहे. अनेक विट भट्टी धारकांकडे लाकूड वापरासाठी आवश्यक परवाना नसतानाही सर्रासपणे लाकूड जाळले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

या संदर्भात भट्ट्यांमध्ये लाकूड जाळले जात असल्याची छायाचित्रे व माहिती नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतरही संबंधित विट भट्टी धारकांवर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, वन विभागाने ज्या ठिकाणी वनरक्षकांची नियुक्ती केली आहे त्या ठिकाणी अनेकदा वनरक्षक हजर राहत नसल्याचीही चर्चा स्थानिक पातळीवर आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही लाकूड तस्करांकडून जंगलातील वृक्षांची अवैधरित्या तोड करून त्याची वाहतूक केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे परिसरातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

वन विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून विना परवाना लाकूड वापरणाऱ्या विट भट्टी धारकांवर कठोर कारवाई करावी, तसेच अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी या गंभीर प्रकारात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button