क्राईमताज्या घडामोडी

गौण खनिज माफियांचा बेकायदेशीर धंदा तेजीत; महसूल विभाग ‘आदेशाची’ वाट पाहत.

ग्राम महसूल अधिकारी–तहसील प्रशासनात आदेशाची प्रतीक्षा; शासनाच्या महसुलाला लाखोंचा फटका.

सोयगाव दि. ०३ (प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यातील फर्दापूर–जळगाव महामार्गालगत अवैधरित्या गौण खनिज वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरखेडी बु.–धनवट ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत, फर्दापूरपासून काही अंतरावर असलेल्या धनवट परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक बांधकामे सुरू आहेत. याच परिसरातील राजकुंवर महाविद्यालयासमोरील बांधकामासाठी अंदाजे ३०० ते ४०० ब्रास मुरुम अवैधरित्या आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दि. ०१ रोजी सायंकाळी समोर आला.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित बांधकामस्थळी गौण खनिज माफियाकडून परवानगीशिवाय मुरुमाची वाहतूक करण्यात येत होती. याबाबत धनवटचे ग्राम महसूल अधिकारी क्षितिज निंबाळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सोशल मीडियावर छायाचित्रांसह माहिती देण्यात येऊनही कोणतीही तातडीची कारवाई झालेली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दि. ०२ रोजी सोयगाव तहसील कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी क्षितिज निंबाळकर यांना विचारणा केली असता, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मनिषा मेने-जोगदंड यांचा लेखी आदेश मिळाल्याशिवाय कारवाई करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महसूल विभागात जबाबदारीची ढकलाढकली सुरू असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
तालुक्यात अवैधरित्या वाळू व इतर गौण खनिजांची वाहतूक सर्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने तहसीलदारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाळू साठ्याचे लोकेशनसह माहिती दिली होती. तरीही संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, वाळू व गौण खनिज माफियांचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लागेबांधे असल्यामुळेच कारवाई होत नसल्याची चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्येच सुरू असल्याचे समजते. ग्राम महसूल अधिकारी कारवाई करीत नाहीत की तहसीलदारच अधिकाऱ्यांना रोखत आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची बाब समोर येत आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार, तसेच अवैध गौण खनिज वाहतुकीवर कडक कारवाई होणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संबंधित महसूल कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button