सोयगावात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी होणार.
पायी पालखी, दुग्धाभिषेक, ढोल-ताशे व आकर्षक देखावे; हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीची अपेक्षा.

सोयगाव दि. ०५ (वृत्तसेवा) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ‘फाल्गुन वद्य तृतीया’ अर्थात ६ मार्च रोजी सोयगाव शहरात तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शिवजयंतीसाठी जोरदार तयारी सुरू असून हजारो शिवभक्त या उत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षल फुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे नियोजन, विविध उपक्रमांची रूपरेषा तसेच समितीची घोषणा करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी सागर इंगळे तर सचिवपदी निलेश नागपुरे यांची निवड करण्यात आली असून इतर पदाधिकाऱ्यांनाही विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
यावर्षी शिवजन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पायी पालखी सोहळा, दुग्धाभिषेक सोहळा, ऐतिहासिक व सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे, ढोल-ताशांचा गजर तसेच लेझीम पथकांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

यासोबतच वेताळवाडी किल्ल्यावर पायी पालखी सोहळ्यासह महाराजांचा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी सजावट व रोषणाईची तयारी पूर्ण झाली असून सकाळी सहा वाजल्यापासून सोयगाव शहर शिवमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा शिवजन्मोत्सव अधिक उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.



