महाराष्ट्र

१० महिन्यांपासून देयके रखडली; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची वाहने बंद होण्याच्या मार्गावर.

२५ वाहनधारक आर्थिक संकटात; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर परिणामाची भीती.

छत्रपती संभाजीनगर दि. २९ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यरत असलेल्या वैद्यकीय पथकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाडेतत्त्वावरील वाहनांची तब्बल दहा महिन्यांची देयके रखडल्याने वाहनधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. देयके तातडीने न मिळाल्यास वाहने बंद करण्याची वेळ येईल, असा इशारा वाहनधारकांनी दिला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडी व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून विविध आजार, जन्मजात दोष, कुपोषण तसेच ‘सॅम’ व ‘मॅम’ या गंभीर कुपोषणाच्या समस्येवर उपचार केले जातात. या कामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ४२ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

या पथकांच्या दौऱ्यासाठी लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून २५ पथकांना भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित १७ पथकांकडे अद्याप वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याचे समजते. दरम्यान, या वाहनधारकांची जवळपास दहा महिन्यांची देयके प्रलंबित असल्याने वाहनांचे हप्ते, विमा, फिटनेस, दुरुस्ती, इंधन खर्च आणि चालकांचे वेतन भागविणे कठीण झाले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणे अवघड झाले असून अनेक वाहनधारक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर एका वाहनधारकाने सांगितले की, संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही देयके मिळालेली नाहीत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देयके अदा करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. वाहनधारकांनी वाहने बंद करण्याचा निर्णय घेतल्यास ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या गंभीर प्रश्नाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच संबंधित आरोग्य विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Back to top button