आपला जिल्हा

सोयगाव पोलिस ऑनड्यूटी; कर्तव्य हीच आमची दिवाळी!

सोयगाव पोलिसांची अनोखी दिवाळी — सेवा, सतर्कता आणि समर्पणाचा उत्सव!

हिरमुसल्या चेहऱ्यांनी कर्तव्य बजावण्याला दिले पोलिसांनी प्राधान्य.

सोयगाव दि. २८ (वृत्तसेवा) राज्यभर दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, सोयगाव पोलिस ठाण्यात मात्र एक वेगळंच चित्र दिसून आलं. सर्वत्र कुटुंबांसोबत फटाके फोडत, फराळाचा आनंद घेत असताना, सोयगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र “कर्तव्य हीच आमची दिवाळी” या भावनेतून रात्रंदिवस नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवत होते.

घराघरांत दिव्यांची रोषणाई होती, पण पोलिस ठाण्याबाहेर मात्र शांत वातावरण. दिव्यांचा ओघ नसला तरी, पोलिसांच्या डोळ्यांत कर्तव्याची ज्योत झळकत होती. कुणी फराळाच्या ताटात गोडवा वाढवत होतं, तर सोयगाव पोलिस मात्र अपघातग्रस्तांना जिवदान देत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात फटाक्यांचा आवाज नव्हता, पण मानवी सेवेचा प्रकाश झळकत होता.

संपूर्ण तालुक्यात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, एसटी चालक-वाहक, व विशेषतः पोलिस कर्मचारी यांनी स्वतःचा सण विसरून जनतेसाठी कर्तव्य बजावले. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्तपणे दिवाळी साजरी करण्यामागे याच कर्तव्यनिष्ठ सेवकांचा हातभार आहे.

सोयगाव पोलिस ठाण्यातच साजरी झाली दिवाळी.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन २४ तास सतर्क असते. या वर्षीदेखील दिवाळीच्या काळात सोयगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी आपल्या पोस्टवर तैनात राहिले.
पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, उपनिरीक्षक रजाक शेख यांनी कर्मचाऱ्यांसोबतच दिवाळी साजरी करत कर्तव्य बजावले. काही तास आनंदाचा क्षण घेतल्यानंतर पुन्हा सर्वांनी गस्तीसाठी बाहेर पडून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली.

🔹 आरोग्य सेवकांचीही सेवा सतत सुरू

दिवाळीच्या काळातही सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. अनेक डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांनी “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडले. फटाक्यांच्या आवाजापेक्षा स्टेथोस्कोपचा आवाज आणि सेवा देण्याचा उत्साह अधिक जाणवत होता.

“कुटुंबासोबत सर्वांनाच दिवाळी साजरी कराविशी वाटते. परंतु कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना २४ तास अलर्ट राहावे लागते. त्यामुळे माझ्यासह आमचे वरिष्ठ अधिकारी, स्पेशल ब्रांचचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर होते. ऐन दिवाळीत आमच्या चमूंनी मोठ्या कारवाया केल्या आहेत. नागरिकांनी आनंदाने दिवाळी साजरी केली, म्हणजे आमची दिवाळीसुद्धा आनंदाने साजरी झाली.”
पंकज बारवाल, पोलिस निरीक्षक, सोयगाव

🔹 कर्तव्याची दिवाळी — समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण

सोयगाव पोलिस, आरोग्य कर्मचारी, तसेच एसटी कर्मचारी यांनी दाखवलेली जबाबदारी आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी आहे. “कुटुंबासोबतची दिवाळी थोडी दूर गेली तरी, जनतेचा विश्वास मिळवणे हीच खरी सणसाजरी”, हेच या सेवकांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले.

शेअर करा.

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका.