बसस्थानकातच मटण दुकानाचा बस्तान!
उंडणगाव–हळदा मार्गावरील वसई फाटा बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय; ग्रामपंचायत-महसूल विभागाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार.

छत्रपती संभाजीनगर दि. ३० (प्रतिनिधी) उंडणगाव–हळदा रस्त्यावरील वसई फाटा येथील बसस्थानकातच एका मटण विक्रेत्याने दुकान थाटल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व प्रतीक्षेसाठी असलेल्या बसस्थानकाचा वापर थेट मटण विक्रीसाठी होत असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहण्याची वेळ आली आहे. वसई, जळकी, वसईवाडी, सराटी, बोदवड, कोंबडवाडी, रावतळवाडी आदी गावांतील शेकडो नागरिक या बसस्थानकाचा दररोज वापर करतात. सकाळी व सायंकाळी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नोकरदारांची येथे मोठी गर्दी असते. मात्र बसस्थानकाच्या जागेवरच मटण दुकान सुरू झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराबाबत ग्रामसेवक श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित मटण विक्रेत्याने ग्रामपंचायतीकडून कोणतीही ना हरकत अथवा परवानगी घेतलेली नाही. सदर जागा महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संबंधितांना नोटीस देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “याबाबत माझ्याकडे कोणतीही नोंद नाही. तहसील कार्यालयात लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,” असे सांगितले. एकीकडे ग्रामपंचायत जागा महसूल विभागाची असल्याचे सांगत आहे, तर महसूल विभाग तक्रारीनंतरच कारवाईचे संकेत देत आहे. त्यामुळे जबाबदारी नेमकी कोणाची आणि कारवाई कोण करणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत व्यवसाय सुरू राहणे हे स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून अनधिकृत अतिक्रमण हटवावे व बसस्थानक प्रवाशांसाठी मोकळे करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोण काय म्हणाले?
“संबंधित मटण विक्रेत्याने ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी किंवा ना हरकत घेतलेली नाही. जागा महसूल विभागाच्या अखत्यारीत असली तरी आम्ही नोटीस देऊन आवश्यक ती कार्यवाही करू.” ग्रामसेवक श्री. पाटील :
“या प्रकरणाची माझ्याकडे कोणतीही नोंद नाही. तहसील कार्यालयात लेखी तक्रार आल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.” तलाठी गिरीश पाटील
ठळक मुद्दे
बसस्थानकातच मटण दुकान थाटल्याचा प्रकार.
विद्यार्थी, महिला व प्रवाशांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ.
ग्रामपंचायत व महसूल विभागाकडून जबाबदारी टाळण्याचा आरोप.
नागरिकांकडून तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी.



