आपला जिल्हा

वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्याकडून वन्यजीव संवर्धकांवर दबाव तंत्राचा वापर, वन मंत्र्यांकडे तक्रार करणार दिनेश गायकवाड.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) बहुलखेडा येथील अजगर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांचा जामीन मंजूर झाला किंवा नाही याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना वन्यजीव संवर्धक दिनेश गायकवाड यांनी विचारणा केली असता त्यांनी माहिती देणे टाळले. उलट असभ्य भाषेचा वापरत दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने तालुक्यातून खळबळ उडाली आहे. जखमी, मृत वन्यजीव, वन्यप्राण्यांची माहिती देण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधला असता ते असभ्य भाषेचा वापर करीत उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप तालुक्यातील वन्यजीव संवर्धकांनी केला आहे. याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मिसाळ यांची तक्रार करणार असल्याचे वन्यजीव संवर्धक दिनेश गायकवाड यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील श्रेणी -१. अजगर हत्या प्रकरण ताजे असतांना तालुक्यातील मौजे पळाशी नियतक्षेत्र जवळ असलेल्या धरणात मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात दोन अजगर अडकल्याची घटना दि. १७ बुधवारी उघडकीस आली होती. दरम्यान जाळ्यात अडकलेल्या दोन अजगर पैकी एक मृत अवस्थेत आढळला तर दुसऱ्या अजगराची सर्प मित्रांनी बुधवारी रात्रीच्या वेळी रेस्क्यू करीत त्याच्यावर उपचार करून अधिवासात सोडले. दरम्यान मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात दोन अजगर अडकले असल्याची माहिती इतर लोकांनी वनविभागाला दिल्याने वनविभागाने ही माहिती सर्प मित्रांना दिलीअसल्याचे सर्प मित्रांनी सांगितले. क्षणाचाही विलंब न करता सर्प मित्रांनी घटनास्थळी धाव घेत रात्री ०७:२० वाजता एका जिवंत अजगराचा रेस्क्यू केला. तर दुसरा अजगर मृत आढळला. जिवंत अजगरावर सर्प मित्रांनी उपचार करून त्याला अधिवासात सोडले. दि. १८ गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी जोगदंड व डॉ. दानीश बुखारी यांनी मृत अजगराचे शवविच्छेदन करण्यात आले. वनविभागाचे वनपाल एम. एम.अली, वनरक्षक सुप्रिया चौधरी, जयश्री आगळे व वनसेवक सोमीनाथ पायगव्हाण यांच्या उपस्थितीत मृत अजगरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वन्यजीव, वन्य प्राणी यांच्या बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी माहिती देण्याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत दबाव तंत्राचा वापर केला जातो. त्यांच्या अशा वागणुकीमुळे वन्यजीव संवर्धकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान पळाशी येथील मृत अजगर प्रकरणी वनविभाग वन गुन्हा दाखल करणार की, वन्यजीव संवर्धक यांना संघर्ष करावा लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button