चालक व वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रुग्णास एक तास १०८ रुग्णवाहिकेची प्रतिक्षा…
१०८ रुग्णवाहिका उभी, नातेवाईकांकडून संताप...
सोयगाव दि. ०९ (वृत्तसेवा) सोयगाव ग्रामीण रुग्णालय येथे १०८ रुग्णवाहिका उभी असतांना रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय अधिकारी हे वेळेवर हजर नसल्याने रुग्णास तब्बल एक तास उशिरा रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी १०८ च्या गलथान कारभारा विषयी संताप व्यक्त केला. तर १०८ ही रुग्णवाहिका रुग्णांना वेळेवर मिळत नसल्याने एका रुग्णाला जीव गमवावा लागला होता. हलगर्जी करणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालक व रुग्ण वाहिकेवरील वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कोण कारवाई करणार हे मात्र अनुत्तरीत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, रामजीनगर येथील रहिवासी श्रीमती तापाबाई विठ्ठल करपे वय ८० वर्षे यांना दि. ७ रविवारी दुपारी चार वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे यांनी या महिलेवर उपचार सुरू केले. दि. ८ सोमवारी सकाळी महिलेचा रक्तदाब कमी होत असल्याने पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे घेऊन जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेच्या नातेवाईकांना दिला. यावेळी विशाल करपे या तरुणाने १०८ या भ्रमणध्वनीवर सकाळी ०८:०८ वाजता संपर्क केला. १०८ रुग्णवाहिका ही ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभी होती. मात्र रुग्णवाहिकेवर नियुक्ती असलेले चालक व वैद्यकीय अधिकारी मात्र वेळेवर हजर नव्हते. चालक अर्ध्यातासांतर रुग्णवाहिकेजवळ आला तर वैद्यकीय अधिकारी एक तासाने रुग्णवाहिकेजवळ आले. तब्बल एक तासानंतर रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध झाली दरम्यान या काळात रुग्णासह नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. चालक व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई होते की लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली कारवाई टाळली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१०८ रुग्णवाहिकेवर नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी हे मागे रुग्णांजवळ न बसता पुढे चालकांजवळ बसणे नित्याचे झाले आहे. मागे रुग्णांना काहीही झाले तरी वैद्यकीय अधिकारी हे बघत नसून ते फक्त १०८ या रुग्णवाहिकेला वाहक (किनर) असल्या सारखे बसलेले दिसून येतात. कारवाई होत नसल्याने हे नित्याचेच झाल्याची चर्चा ग्रामीण रुग्णालयात सुरू होती.



