धरणातून अवैधरित्या होत असलेला पाणी उपसा बंद करण्यासाठी वडगाव तिगजी येथील महिला सरपंच व सदस्या आक्रमक…
जिल्हाधिकाऱ्यांचे पथक कागदावरच..

सोयगाव दि. ०५ (प्रतिनिधी संदीप इंगळे) तालुक्यातील वडगाव तिगजी व पिंप्री अंतुर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या निमखेडी धरणातून अवैधरित्या पाणी उपसा केला जात असून दहा ते पंधरा दिवस गावासपाणी पुरवठा होईल इतकाच पाणी साठा धरणात शिल्लक आहे. अवैधरित्या पाणी उपसा सुरू असून तो तात्काळ बंद करण्याबाबत दि. २७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेमध्ये ठराव क्रमांक चार सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वडगाव तिगजीच्या महिला सरपंच श्रीमती अक्काबाई लाडके यांनी तहसीलदार श्रीमती मनीषा मेने, गटविकास अधिकारी पंचायत समिती, महावितरण कंपनी यांच्याकडे दि. २२ मार्च रोजी लेखी अर्जाला ठरावाच्या नकला जोडून तक्रार केली असून तहसीलदारासह यंत्रणेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली. नसल्याने वडगाव तिगजी व पिंप्री अंतुर या गावांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तर तात्कालीन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या आदेशाला तहसीलदार यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी खो दिल्याने तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. लोकप्रतिनिधी व्यस्त, अधिकारी सुस्त तर महिला सदस्या पाणी उपसा बंद करण्यासाठी त्रस्त झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सात सदस्य असलेल्या वडगाव तिगजी ग्रामपंचायत मध्ये सात ही महिला सदस्या ची बिनविरोध निवडीमुळे वडगाव तिगजी ग्रामपंचायत मध्ये महिलाराज सुरू आहे. निमखेडी धरणाच्या बाजूला गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतची विहीर आहे. धरणातून सतत अवैधरित्या पाणी उपसा सुरू असल्याने विहिरींची पाणीपातळी घटली आहे. उष्णतेचा पारा चढत असून गावाला दहा ते पंधरा दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो इतका पाणी साठा शिल्लक आहे. धरणातून अवैधरित्या पाणी उपसा केला जात असल्याने महिला सरपंचासह सदस्या गावाच्या हितासाठी सरसावल्या आहेत. मासिक सभेमध्ये अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्या बाबतचा ठराव घेऊन ठरावाच्या प्रति जोडून सोयगाव तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने धरणातून अवैधरित्या पाणी उपसा सुरूच आहे. यामुळे वडगाव तिगजी व पिंप्री अंतुर या दोन्ही गावाच्या पाच ते सहा हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातही सदस्या महिला आहेत तहसीलदार सुद्धा महिला असून देखील महिलांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. तर संबंधित यंत्रणेचे अधिकारी सुद्धा या महिला सदस्यांना जुमानत नसल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. दरम्यान सोयगाव तालुका दुष्काळ ग्रस्त तालुका घोषित झाला असून पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी तालुक्यात असलेल्या धरणातून अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यावर कारवाई करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पथक स्थापन केले होते. तालुक्यात धरणातून अवैधरित्या पाणी उपसा सुरूच असून पथकाने तालुक्यात एकही कारवाई केली नसल्याने पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होते आहे. पथक प्रमुख उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी (महसूल) तर सदस्य तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपंचायत, उपविभागीय अभियंता पाटबंधारे सचिव, सदस्य उपविभागीय अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांचा या पथकात समावेश आहे. मात्र तालुक्याचे दुर्दैव अद्यापही या पथकाने अवैधरित्या पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाई केली नसल्याने आर्थिक हितसंबंधातून कारवाई केली जात नसल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पथक कारवाई करते का नागरिकांना पाणी टंचाईच्या विळख्यात ढकलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वडगाव तिगजी ग्रामपंचायतच्या वतीने तहसीलदार सोयगाव, पंचायत समिती सोयगाव व महावितरण कंपनी यांना धरणातून अवैधरित्या पाणी उपसा होत असून यामुळे गावास पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. यावर काहीच कारवाई झाली नाही.तात्काळ कारवाई न झाल्यास सरपंच व सर्व महिला सदस्या तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत आहोत.शासनाने आम्हा महिलांवर ही वेळ येऊ देऊ नये. अक्काबाई लाडके – सरपंच, ग्रामपंचायत वडगाव तिगजी.



