रोपवाटिका बंद, महिलांचे तहसीलदारांना निवेदन; तातडीने सुरुवात न झाल्यास उपोषणाचा इशारा. – वन विभाग निद्रिस्त.

सोयगाव दि. १८ (वृत्तसेवा) पाच वर्षांपासून बंद असलेली वनविभागाची रोपवाटिका पुन्हा सुरू करण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. या संदर्भात महिलांनी तहसीलदार मनीषा मेने – जोंगदंड यांची स्वातंत्र्य दिनी (दि. १५ शुक्रवार रोजी) ध्वजारोहण नंतर भेट घेऊन लेखी निवेदन देत तातडीने रोपवाटिका सुरू करण्याची मागणी केली असून, मागणीची दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देखील दिला आहे.
निवेदनात महिलांनी नमूद केले आहे की, रोपवाटिका बंद असल्याने शेकडो महिलांचे रोजगार हिरावला गेला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोपवाटिकेत काम करून अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह चालत होते. मात्र, मागील पाच वर्षांपासून रोपवाटिका बंद असल्यामुळे महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा वनविभाग यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी करून रोपवाटिका सुरू करण्याबाबत विनंती केली असता वनविभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वनविभाग अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शेकडो वनमजूर महिलांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न महिलांना पडत आहे. तरी तात्काळ रोपवाटिका सुरु करुन महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वनमजूर महिलांनी केली आहे. महिलांच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी देखील पाठींबा दर्शविला असून, रोपवाटिका पुन्हा सुरू न झाल्यास वनमजूर महिला उपोषण करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनातून केला आहे. देण्यात आलेल्या निवेदनावर वंदनाबाई वाघ, विद्या मोरे, सरला सोनवणे, पूजा जाधव, जयश्री बिऱ्हारे, शांताबाई मंडवे, मनीषा मोरे, अलकाबाई जाधव, वंदनाबाई बनसोडे, आशा इंगळे यांच्यासह आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



