जि. प. शाळेतील मुलीला परिपाठ वेळी भुरळ, शिक्षिका व शिक्षकांनी मुलीला तत्काळ उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात केले दाखल.

सोयगाव दि. २० (वृत्तसेवा) शहरातील जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थिनीला दि. २० बुधवारी सकाळी शाळेत परिपाठाच्या वेळी भुरळ येत असल्याने ती खाली बसली व तिची अचानक तब्येत बिघडल्याने शाळेतील शिक्षिका व शिक्षक यांनी कोणताही विलंब न करता मुलीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंदारे व परिचारिका यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कु. नंदिनी संजय पाडळकर (इयत्ता नववी) वय १५ वर्षे, रा. गलवाडा एस. ता. सोयगाव असे जिल्हा परिषद प्रशालेत सकाळी परिपाठाच्या वेळी भुरळ येऊन अचानक तब्येत बिघडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान नंदिनीची अचानक तब्येत बिघडल्याने तिला तत्काळ गट शिक्षण विभागातील भिकन पाटील यांच्या चारचाकी वाहनातून शिक्षिका सिमा राऊत, जया वाघ व शिक्षक पंकज रगडे यांनी कोणताही विलंब न करता विद्यार्थिनीला तात्काळ ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंदारे व परिचारिका सोनाली झिंजे आदींनी कु. नंदिनी या विद्यार्थिनीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले. दरम्यान विद्यार्थिनी साठी रुग्णालयात जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सिमा राऊत व जया वाघ यांनी चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात होते



