सोयगाव येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही व नियंत्रण कक्षांचे लोकार्पण, नागरिकांच्या सुरक्षेसाठी डिजिटल पाऊल.

सोयगाव दि. ०५ (वृत्तसेवा) सोयगाव शहरांमध्ये पोलीस ठाण्याचे वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन निधीतून उभारण्यात आलेल्या “सुरक्षित शहर” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली, पब्लिक ॲड्रेस (पी. ई.) सिस्टीम व नियंत्रण कक्षांचे लोकार्पण माजी पालकमंत्री तथा आमदार मा. अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते मंगळवारी (दि. ५) पार पडले. या वेळी पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार करण्यात आला आहे. उद्घाटनावेळी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, “अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व पी. ई. सिस्टीम बसविल्यामुळे शहरांमध्ये डिजिटल सुरक्षिततेचा नवा युग प्रारंभ झाला आहे. या प्रणालीमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, गर्दीचे नियोजन करणे तसेच धार्मिक सण, सभा व मोर्च्यांच्या वेळी पोलीसांना मदत होणार असून नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड म्हणाले, “नियंत्रण, सुरक्षा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित ही यंत्रणा शहरांना नवी ओळख देईल. सिल्लोड, फर्दापुर व सोयगाव ही तिन्ही शहरे राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारी आटोक्यात आणणे व पोलीस यंत्रणेला सक्षम करणे शक्य होईल,” असे त्यांनी सांगितले.
अत्याधुनिक सुविधांची वैशिष्ट्ये
चेहरा ओळख प्रणाली
वाहन क्रमांक ओळख प्रणाली
ध्वनी टिपणारी व्हॉइस माईक प्रणाली
पीटीझेड -कॅमेरे – ३६० अंश फिरून रात्रीही स्पष्ट दृश्य
पब्लिक ॲड्रेस सिस्टीम – नागरिकांना थेट सूचना देण्याची सुविधा
कॅमेरा व नियंत्रण कक्षांची संख्या
सोयगाव: ४३ कॅमेरे, ५ पी.ई. सिस्टीम
आल्या आहेत. याशिवाय, या कॅमेरामध्ये सात दिवसांची डेटा बॅकअप सुविधा असून नियंत्रण कक्षामध्ये ९० ते १०० दिवसांपर्यंत व्हिडिओ सुरक्षितरीत्या जतन केला जाणार आहे. या प्रणालीमुळे स्मार्ट पोलिसिंगला चालना मिळून गुन्हेगारी नियंत्रण व नागरिकांच्या सुरक्षेत मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या वेळी पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, राजू राठोड, प्रभाकर काळे, अर्जुन गाढे, नंदू सहारे, अक्षय काळे, राजू दुतोंडे, सुनील गव्हांडे, राजेंद्र जावळे, मंगेश सोहनी, मयूर मनगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, रजाक शेख, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक उपस्थित होते.



