सोयगाव तहसील कार्यालयात तहसीलदार मिळेना, नागरिकांची कामे होईना.
तहसीलदार कार्यालय सोडून फर्दापूर येथून कारभार का चालवतात ?
सोयगाव दि. ०२ (वृत्तसेवा) गेल्या महिन्यात दहावी बारावी चा निकाल लागला असून विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कागद पत्रांची जुळवाजुळव करीत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कमी जास्त स्वरुपात पडला आहे त्यामुळे त्या ठिकाणचे पंचनामे, मतदनिधी, विविध विकास योजना, संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना अर्ज व केवायसी, पुरवठा विभागातील आदी कामांसाठी सध्या सोयगाव तहसील कार्यालयात नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असताना येथील तहसीलदार मनिषा मेने – जोगदंड ह्या सोयगाव ऐवजी फर्दापूर शासकीय विश्राम गृह येथूनच तहसीलचा कारभार चालवत असल्याचे आज दि. ०२ आठवड्यातील पहिला सोमवार रोजी उघड झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना एकच प्रश्न निर्माण होत आहे. सोयगाव तहसीलदार ह्या तहसील कार्यालयातील कारभार तहसील कार्यालय सोडून फर्दापूर येथून का चालवतात.?
सोयगाव तहसील कार्यालयात तहसीलदार कधी येणार असे विचारले असता अधिकारी व कर्मचारी सांगतात कि तहसीलदार कधी येतील आम्हाला नाही सांगता येणार. तहसील कार्यालयात हालचाल बुक नसल्याने कोण अधिकारी कधी येणार व कधी जाणार हे मात्र कोणालाच माहिती होत नाही. आज आठवड्यातील पहिला सोमवार असल्याने नागरिक आपले कामे होतील अशा मोठ्या आशाने येत असतात परंतु कार्यालयात अधिकारीच नसल्याने नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करत आल्या पावली परत जावे लागले. तहसीलदार मॅडम ह्या आज तहसील कार्यालय येथे येणे गरजेचे असताना देखील त्या सोयगाव पासून १२ कि. मी. असलेल्या फर्दापूर येथील शासकीय विश्राम गृह येथे दु. ०३ ते ०५ वाजे दरम्यान आल्या असल्याचे समजते. त्यामुळे सोयगाव चे तहसील कार्यालय हे फर्दापूरला स्थालांतर झाले तर नाही ना अशी चर्चा विविध कामे घेऊन आलेल्या नागरिकांमध्ये तहसील परिसरात चांगलीच रंगली होती.
तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदाची चार पदे आहेत. महसूल नायब तहसीलदार, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार, पुरवठा नायब तहसीलदार व निवडणूक नायब तहसीलदार अशी पदे आहेत. प्रशासन महसूल विभागाचे नायब तहसीलदार यांना स्वतःचा विभाग सांभाळून नगर पंचायत चा प्रभारी मुख्याधिकारी कार्यभार सांभाळावा लागत आहे. सोयगाव तालुक्यात एकूण ८६ गावे असून, सोयगाव तालुका हा भूगोलिकदृष्टीने फुलपटी सारखा १२५ कि.मी. लांब आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार एक लाख तेरा हजार संत्यांशी (१,१३,०८७) इतकी आहे. त्यानंतर या लोकसंख्येत वाढ झाली आहे.
सोयगाव तहसील कार्यालयात शासकीय कामासाठी दररोज नागरिकांची प्रचंड गर्दी असते. दररोज द्यावयाचे शासकीय दाखले, महसूल विभागाची कामे, रेशन कार्ड, निवडणूक कामे तसेच शेती संदर्भातील कामे यासाठी तालुक्यातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात कामे रेंगाळत पडली आहे. खासदार कल्याण काळे व आ. अब्दुल सत्तार यांनी गांभीर्याने लक्ष घालून, हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.

अधिकारीच मुख्यालई राहत नाही तर आम्ही तर का राहायचे…
तहसीलदार ह्या मुख्यालई राहत नसून त्या छत्रपती संभाजीनगर येथून आठवड्यातील मोजक्याच दिवशी मोजकेच तास कार्यालयात येतात. मात्र त्यांचे वाहन हे अनेक वेळा सोयगाव तहसील येथून गायब असते. परंतु तहसीलदार ह्या सोयगाव येथे पोहचतच नाही. त्यामुळे सोयगाव येथे निवासी तहसीलदार देखील नाही. महसूल पथक तर नेहमीच फोन बंद करून घरी असतात. महसूल चे तहसीलदार, नायब तहसीलदार, पेशकर, लिपिक, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल हेच मुख्यालई राहत नसल्याने विभागीय आयुक्त दिलीपजी गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.



