माळेगाव पिंपरी धरणातून सर्रासपणे मुरूमचा उपसा, महसूल विभागाने कारवाई कडे फिरवली पाठ, महसूल विभागात बबलू भैय्या ची दहशत.

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरी लघुपाटबंधारे (जिल्हा परिषद) अंतर्गत असलेल्या साठवण तलावातून भर दुपारी सर्रासपणे जेसीबीच्या सहाय्याने हजारो ब्रास मुरुमाचा उत्खनन करून चार हायवा च्या मदतीने मुरूम वाहतूक केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व सोयगावच्या कार्यक्षम तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड यांना सोशल मिडिया व भ्रमणध्वनीद्वारे दुपारी तीन वाजेच्या सुमारास सविस्तरपणे माहिती दिली. तात्काळ तलाठी यांना पाठवते व अव्वल कारकून आस्थापना गोपीनाथ जयवळ, नायब तहसीलदार चैनसिंग बहुरे व नायब तहसीलदार काकासाहेब साळवे यांना पण कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. तहसिल कार्यालयापासून अवघ्या दहा कि. मी. अंतरावर दोन तासांचा कालावधी लोटला तरी देखील महसुलचा एकही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचला नाही. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना विचारणा केली असता यांनी सांगितले की, बबलू भैय्या (तुमच्या गावातील मोठी व्यक्ती) यांचा फोन आला होता. त्यामुळे कारवाई करण्यासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकही महसुलचा कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचलेच नाही.
कारवाई करण्यासंबंधी तहसीलदार मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन बंद करून ठेवला होता. दरम्यान महसूल चे पथक येत असल्याची माहिती उत्खनन करणाऱ्यांना मिळताच जेसीबी व हायवा सह त्यांनी धूम ठोकली होती. बबलू भैय्या चे महसूल विभागाला गेलेल्या फोन मुळे गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणे, महसूल विभागाने टाळल्याने बबलू भैय्या पुन्हा चर्चेत आला आहे. कोण आहे हा बबलू भैय्या, अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाराकडून महसूल विभागासाठी चिरीमिरी तर जमा करीत नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सोयगाव शहरासह तालुक्यात दिवस रात्री – बेरात्री अवैधरित्या गौण खनिज वाहतूक सर्रास सुरू असून बबलू भैय्या मुळेच अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग धजावत नाही. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वाळीत टाकलेल्या सोयगाव तहसिल कार्यालयाच्या कारभारावर आता तरी कारवाई करतात की बबलू भैय्याच्या असलेल्या दहशतीला बळी पडत लाखो रुपयांचा महसूल बुडतांना बघतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवृत्त नायब तहसीलदार, तलाठी सजेचे झिरो, कोतवाल, व बबलू भैय्या यांच्या हस्तक्षेपामुळे सोयगाव तालुक्यात राजरोस पणे सुरु असलेल्या सर्रास अवैद्य रित्या गौणखनिज वाहतुकीवर सोयगाव तहसील कार्यालयाकडून कोणतेही कारवाई केली जात नसल्याने भ्रष्टाचार वाढला आहे.

“मी पाहणी करतो, बघतो व तात्काळ कारवाई साठी माझा सहाय्यक मोरे व मनोज यांना पाठवतो आहे.” तलाठी बागुल.
“माझ्या कडे पुरवठा अधिकारी निरीक्षण ची जबाबदारी असून आज शिधापत्रिका धारकांची गर्दी होती. त्यामुळे मी घटना स्थळी पोहचू शकलो नाही. तरी मी सोयगाव येथील तलाठी शंकर देवतुले यांना सूचना केली असता ते घटना स्थळी गेले नाही.”काकासाहेब साळवे पुरवठा निरीक्षक अधिकारी सोयगाव.

“पाझर तलावातून मुरम उत्खनन साठी कोणीही परवानगी मांगितली नसून तसेच आम्हीही कोणालाच मुरूम उत्खनन करण्या साठी परवानगी दिलेली नाही.” एस. एच. महाजन उपविभागीय अभियंता (जि.प.सिचन) सिल्लोड.



