क्राईम

सोयगाव शहरासह तालुक्यात सकाळी पाच पासुन ते रात्री अकरा पर्यंत मिळतेय देशीदारु.

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) मद्याच्या नशेत भावी पिढी उद्ध्वस्त होत आहे. असे असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वत:च्या नियमांनाच पायदळी तुडवले जात आहे. शहरातील देशी – विदेशी दारूची दुकाने सकाळी १० वाजेनंतर उघडण्यात यावीत, असा शासकीय नियम आहे. प्रत्यक्षात मात्र, सकाळी तांबडे फुटत नाही. तोच तळीरामांची सोय होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम, सकाळपासूनच शहरात राजरोसपणे मद्याची विक्री केली. जात असल्याचे समाजसेवक कृष्णा पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली आहे. सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे स्थानिक पोलिस मात्र देशी दारू दुकानांविरोधात कारवाई करताना ‘डगमगताना’ दिसत आहेत. यामुळे सामान्यांना मद्यपींच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. देशी दारूसाठी व्यसनमुक्ती धोरण व उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यांना मूठमाती दाखवण्याच्या सोयगाव तालुक्यात चालु आहे.

वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात देशी-विदेशी दारू विक्रेत्यांना असणारी मूळ अटच निकालात निघाली असून, आता धार्मिक स्थळे, शाळा – महाविद्यालयांच्या आवारालगतच मद्याची दुकाने थाटलेली दिसत आहेत. ज्यावेळी विक्रेत्यांना प्रशासनाकडून मद्यविक्रीसाठी परवाने देण्यात आले, त्या वेळी शाळा – महाविद्यालये, धार्मिक स्थळ आणि मद्याच्या दुकानांतील अंतर नियमांनुसार २०० ते ३०० मीटरपर्यंतचे होते. मात्र, विक्रेते आणि संबंधित संस्थांकडून विस्तारीकरणामुळे दोघांमधील अंतर कमी होत गेल्याची सबब पुढे करून आता कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. यापेक्षाही भयानक म्हणजे परवानाधारक मद्य विक्रेत्यांना उत्पादनशुल्क विभागाकडून वेळेच्या मर्यादा घालून दिलेल्या असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसत असूनही त्याकडे राज्य उत्पादन शुल्क  विभागाकडून डोळेझाक केले जात आहे. देशीदारु दुकानदार सकाळी पाच वाजे पासुनच व रात्री उशिरा अवैद्य दारु विकणाऱ्यांना खोके पोहच करण्यात येतात. या साठी देशीदारु दुकानदार व अवैद्य विक्री करणाऱ्याकडुन स्थानिक पोलिस प्रशासनापासुन तर जिल्हा अधिक्षकांपर्यंत हप्ते बांधणी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

विद्यार्थी, महिला, पालकांनाही त्रास…

शहर, तालुका परिसरातील मंदिरांत ज्याप्रमाणे भाविकांना मद्यपींचा त्रास सोसावा लागत आहे. त्यापाठोपाठ मद्य विक्रीच्या दुकानांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी सोडविण्यासाठी येणार्‍या पालकांनाही मद्यपींच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. या मद्यपींकडून दिवसाच्या सुरुवातीला सकाळी ६ ते ९ वाजेच्या सुमारासच भांडणे करून यथेच्छ शिवीगाळ सुरू असते. त्यामुळे बालवाडी, प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या कानी अशा शिव्या पडून त्यांच्या मनावरही परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ व पालकांचे म्हणणे आहे. असे दृश्य साधारणत: दररोज सोयगाव बस स्थानक परिसरातील सोयगाव शहर मुख्य रस्त्यावर, तहसील कार्यालय समोरील आमखेडा परिसर, सोना नदी पूल भागात समोर बघण्यास मिळते. सोयगाव येथील देशीदारु दुकान सकाळी सहा वाजता उघडले जाते तर रात्री अकरा वाजे. पर्यंत चालू असते. या कडे स्थानिक पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button