भडगाव पारोळा रस्त्यावर वाघरे येथे सोयगाव धुळे बसचा भीषण अपघात एक ठार पाच गंभीर जखमी ; जखमी मध्ये सोयगावच्या तिघांचा समावेश.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) भडगाव – पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ सोयगाव आगाराच्या सोयगाव – धुळे या बसचा एक वाजता भीषण अपघात झाला आहे. सोयगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बस आणि धुळ्याहुन पारोळा कडे जाणाऱ्या टेम्पोने सोयगाव आगाराच्या बसला समोरा समोर वळण रस्त्यावर जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण ठार झाला असून बसच्या चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमी मध्ये सोयगावच्या तिघांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवार २० ऑगस्ट रोजी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सोयगाव आगाराची एसटी बस (क्र. एम. एच. – १४ – बी. टी. – १९८४) सोयगावहून धुळ्याकडे जात असताना वाघरे गावाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पो (क्र. एम. एच. – १९ सी. वाय. – १६०६) या टेम्पोने बसला समोरून आदळून झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला. या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पोमधील प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच प्रशासन पोहोचले.
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे चालविण्यात येणारी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा तात्काळ सक्रिय झाली. रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पारोळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या भीषण अपघातात पंकज पाटील (३०, उंदीरखेडा) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मिराबाई पंढरी सोनवणे (५५, सोयगाव), निलाबाई घनश्याम सिरसागर (७५, धुळे), अंजनाबाई रघुनाथ पाटील (७०, हनुमंत खेडा), मनोहर सजन पाटील (६०, चोरवड), रमेश धोंडू चौधरी (८०, भडगाव), मीराबाई रघुनाथ पाटील (८०, धुळे) आणि जानवी संतोष मोरे (१९, धुळे) यांचा समावेश आहे. या जखमींवर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी देखील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
याशिवाय रघुनाथ गणपंत सोनवणे (ढेकू) हे देखील या अपघातात जखमी झाल्याचे समजते. काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.



