पळाशी अजगर मृत्यू प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी सहकार्य करीत नसल्याचा सर्पमित्रांचा गंभीर आरोप, बदली करण्याची मागणी.

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील मौजे पळाशी नियतक्षेत्र जवळ असलेल्या धरणात काही मासेमाऱ्यांनी मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात दोन अजगर अडकल्याची घटना दि. १७ बुधवारी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान जाळ्यात अडकलेल्या दोन अजगर पैकी एक मृत अवस्थेत आढळला तर दुसऱ्या अजगराची सर्प मित्रांनी बुधवारी रात्रीच्या वेळी रेस्क्यू करीत त्याच्यावर उपचार करून अधिवासात सोडले. वनविभागाने मात्र या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळली असल्याने वन्यजीव संवर्धक यांनी वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील मौजे पळाशी नियतक्षेत्र जवळ असलेल्या धरणा लगत काही मासेमाऱ्यांनी मासे पकडण्यासाठी जाळे लावले होते. सोमवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी नाल्याना मोठा पूर आला होता. धरण ओसंडून वाहत होते. याच दरम्यान मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात दोन अजगर दोन, तीन दिवसांपूर्वी अडकले असल्याची शक्यता सर्पमित्रांनी वर्तवली होती. मासेमारी करणारे सकाळ, संध्याकाळ त्या ठिकाणी जायचे परंतु याबाबत त्यांनी वनविभागाला व सर्प मित्रांना माहिती दिली नाही. इतर लोकांनी जाळ्यात अजगर अडकले असल्याची माहिती वनविभागाला दिल्याने वनविभागाने ही माहिती सर्प मित्रांना दिलीअसल्याचे सर्प मित्रांनी सांगितले. क्षणाचाही विलंब न करता सर्प मित्रांनी घटनास्थळी धाव घेत रात्री ०७:२० वाजता एका जिवंत अजगराचा रेस्क्यू केला.तर दुसरा अजगर मृत आढळला. जिवंत अजगरावर सर्प मित्रांनी उपचार करून त्याला अधिवासात सोडले. दि. १८ गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी जोगदंड व डॉ. दानिश बुखारी यांनी मृत अजगराचे शवविच्छेदन करण्यात आले. वनविभागाचे वनपाल एम. एम. अली, वनरक्षक सुप्रिया चौधरी, जयश्री आगळे व वनसेवक सोमीनाथ पायगव्हाण यांच्या उपस्थितीत मृत अजगरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अजगर प्रकरणी वनविभाग वन गुन्हा दाखल करणार की, वन्यजीव संवर्धक यांना संघर्ष करावा लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वन्यजीव संरक्षण समिती मागील पाच वर्षापासून सतत वन्य प्राणी व सर्प यांच्या सेवेकरिता तत्पर आहे. वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. प्राणी जखमी अवस्थेत सापडले, त्यांना कॉल केल्यास उडवा उडवी चे उत्तर देतात. बहुलखेडा अजगर प्रकरणी चार सप्टेंबरला तक्रार करूनही पाच दिवसानंतर कारवाई केली.
वन्यजीव बाबत गांभीर्य नसलेल्या अशा अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी. अशी मागणी वन्यजीव संरक्षक समिती बनोटी यांच्याकडून केली जात आहे.
बनोटी वनपाल यांना नियमानुसार कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
अनिल मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव.



