जागतिक पर्यावरण दिनीच डेरेदार झाडाची कत्तल, रक्षकच भक्षक! कारवाई करणार कोण?

सोयगाव दि. ०६ (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. ०५ गुरुवारी शासकीय कार्यालयाचे अधिकारी, सामाजिक संस्था वृक्षारोपण करीत असताना, सोयगाव – बनोटी रस्त्यावरील तिडका गावापासून शंभर ते दीड शे मीटर अंतरावर भर दिवसा डेरेदार झाडाची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मात्र वनविभाग व महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. अवैधरित्या डेरेदार झाडांच्या तोडीवर सोयगाव तालुक्यात ना तहसिल कार्यालयाने ना वनविभागाने कठोर कारवाई केली नसल्याने तालुक्यात हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न वृक्षप्रेमीं कडून विचारला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, जागतिक पर्यावरण दिनी दि. ०५ गुरुवार रोजी सोयगाव – बनोटी रस्त्यावरील तिडका गावापासून १०० ते १५० मीटर अंतरावर डेरेदार झाडाची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना व्हाट्सएपद्वारे माहिती दिली असता, वन कर्मचारी जाय मोक्यावर जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी विद्युत लाईनचे काम चालू असल्याने विद्युत लाईनला अडथळा येणारे झाडांच्या फांद्या कट करत आहेत. इतर कोणतेही काम त्या ठिकाणी आढळून आले नाही असे सांगितले. मात्र संबंधिताने फांद्या कट करण्याच्या नावाखाली डेरेदार असलेले संपूर्ण झाडच कट करण्यात आले. विना परवानगी झाड तोडल्यास पन्नास हजार रु. दंड करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. ती घोषणा हवेतच विरली आहे. झाडाची तोड करून लाकडांचा वीट भट्ट्यामध्ये सर्रास वापर केला जात असून कारवाई करण्यासाठी वनविभाग महसूल कडे तर महसूल वनविभागाकडे बोट दाखवत आहे. सोयगाव तालुक्यात अवैधरित्या होत असलेल्या झाडांच्या तोडी प्रकरणी कारवाई कोण करणार असा प्रश्न वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे. तर रक्षकच भक्षक असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे.
“सदरील वृक्ष हे लाईट कामासाठी फांद्या तोडत आहे. वृक्ष मालकी हक्कात असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. पंरतु जर वाहतूक होत असेल तर कारवाई करू. जर मालकी हक्कात वृक्ष तोड होत असेल तर पोलीस व तहसील कारवाई करतील. पूर्ण झाड जर नष्ठ केले तर जाऊन पाहतील, विचारतील, चौकशी करतील करतील.” अनिल मिसाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव.



