फर्दापुरात पोलीस शिपायाची गळफास घेवून आत्महत्या, पोलीस विभागामध्ये हळहळ..

सोयगाव दि. २४ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील फर्दापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फर्दापुर येथे घडली. या पोलीस शिपायास तातडीने सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी फर्दापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
सतीश नारायण हिवाळे (वय ३२) रा. उडनगाव ता. सिल्लोड ह. मु. फर्दापूर असे गळफास घेऊन मृत झालेल्या पोलीस शिपायचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ते फर्दापुर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी दुपारी त्यांनी राहत्या (फर्दापूर येथील निवास्थानी) घरात नायलॉन च्या दोरीने गळफास घेतला घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पोहचताच फर्दापुरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी उत्तरीय तपासणी करून शवं अंत्यसंस्कार साठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे रात्री नऊ वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.



