वाहन भाडे न मिळाल्याने आरबीएसके पथकांची वाहन सेवा छञपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ठप्प.
छत्रपती संभाजीनगर दि. ११ (प्रतिनिधी :- विशाल बिंदवाल) लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नियुक्त पथकांना भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र या संस्थेकडून वाहनधारकांना वेळोवेळी देयके अदा करण्यात येत नसल्याने वाहनधारकांवर उपासमारीची वेळ आली असून, याचाच थेट परिणाम आरबीएसके पथकांच्या कामकाजावर झाला आहे.
लोकसेवा संस्थेकडून वाहन भाडे वेळेवर न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील आरबीएसकेच्या तब्बल १३ पथकांना वाहने उपलब्ध होऊ शकली नाहीत. हा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्था यांना दि. ८ डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्रामुळे उघडकीस आला आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी खोळंबली असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाहनधारकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, मासिक वाहन भाडे वेळेवर न मिळाल्याने डिझेलचा खर्च, वाहन कर्जाचे हप्ते, चालकाचा पगार, वाहन देखभाल, तसेच कुटुंबाचा दैनंदिन खर्च, आरोग्य व मुलांच्या शिक्षणाचा भार पेलणे अशक्य झाले आहे. स्वतः खर्च करून सेवा देऊनही मानधन मिळत नसल्याने अनेक वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. यामुळे संस्थेला भाडेतत्त्वावर वाहने देण्यास वाहनधारक टाळाटाळ करीत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
दरम्यान, राज्य व्यवस्थापक कार्यालय, पुणे यांनी कंत्राटदार संस्थेला नोटीस बजावत यापुढील विलंब टाळण्यासाठी दोन दिवसांत तातडीने पर्यायी वाहने उपलब्ध करून सर्व वाहने सुरळीत सेवेत आणण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन दिवसांत कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पत्रानुसार बंद असलेली वाहन सेवा पुढीलप्रमाणे —
जिल्हा रुग्णालय : मनपा पथक क्र. ०१, ०२, ०३ व ०४
फुलंब्री : आळंद, वडोदबाजार
वैजापूर : शिवूर लोणी, बोरसर मनुर, लाडगाव, गाडेपिंपळगाव
पिशोर (कन्नड) : नाचनवेल, चिंचोली
गंगापूर : शेंदूरवादा पथक, सिद्धनाथ वडगाव, लासूर स्टेशन पथक
लोकसेवा संस्थेकडून वाहनधारकांना वेळेवर व नियमाप्रमाणे मानधन न दिल्याने जिल्हाभरात आरोग्य सेवेसाठी वाहने उपलब्ध होत नसल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांसह आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.



