जिल्हाधिकारी साहेब जागे व्हा, महिलांची आर्त हाक ! तहसील कार्यालयातील महिलासाठीचे प्रसादान गृह बंद, महिलांची कुचंबणा…

सोयगाव दि. ०५ (वृत्तसेवा) सोयगाव तहसिल कार्यालयातील महिलांसाठी असलेले प्रसाधन गृह बंद असल्याने कामानिमित्त तहसिल कार्यालयात दि. ०४ मंगळवारी आलेल्या वयोवृध्द महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. सोयगाव तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी महिलाच असल्याने देखील महिलांच्या भावना समजू शकत नसल्याने महिलांकडून तहसिलदार यांच्यावर संताप व्यक्त केला होता. जिल्हाधिकारी साहेब जागे व्हा अशी आर्त हाकच महिलांनी तहसिल कार्यालय परिसरात दिली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगावच्या तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून श्रीमती मनीषा मेने यांनी पदभार स्विकारल्या पासून तहसिल कार्यालायतील कर्मचारी, नायब तहसीलदारच काय तर स्वतः तहसीलदार मनीषा मेने कार्यालयात वेळेवर येत नसल्याने ग्रामीण भागातून तहसिल कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिक, दिव्यांग, वयोवृध्द महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मनीषा मेने यांना तहसिल कार्यालयातील कर्मचारी अधिकारी जुमानत नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी दि. ०४ मंगळवारी सावळदबारा व मोहळाई या ६० कि. मी. अंतराच्या ग्रामीण भागातून वयोवृद्ध महिला संजय गांधी विभागात पगार मिळावा यासाठी केवायसी करण्यासाठी तहसिल कार्यालयात आल्या होत्या. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. मात्र तहसिल कार्यालयात महिलांसाठी असलेल्या प्रसाधन गृहास टाळे लावले असल्याने महिलांची मोठी कुचंबणा झाली होती. महिला तहसीलदार असतांना देखील महिलांच्या भावना समजू शकत नसल्याने महिलांनी तहसीलदारांवर संताप व्यक्त केला होता. तहसिल कार्यालयात कामानिमित्त आलेल्या महिलांनी संतप्त होत जिल्हाधिकारी साहेब जागे व्हा! अशी आर्त हाक दिल्याची चर्चा तहसिल परिसरात सुरू होती. महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी जागे होतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


