सोयगाव वनविभागाकडून लाकडाने भरलेल्या ट्रकची माहिती गुलदस्त्यात, वनविभागाच्या हप्तेखोरी मुळे लाकूड तस्कर फोफावले–

सोयगाव दि.२४ (वृत्तसेवा) सोयगाव वनपरिक्षेत्रातून लाकडाने भरलेला ट्रक दि. २२ बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास फरदापुर येथे पकडल्याची माहिती सोयगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी दिली. पकडण्यात आलेल्या ट्रक जवळ वनरक्षक शरद चेके हे होते त्यानंतर सोयगाव येथून खाजगी वाहनाने आलेले इतर कर्मचारी हे त्याठिकाणी उपस्थित होते. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना वारंवार माहिती विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी खरी माहिती देण्यास टाळाटाळ केली. या संदर्भात महाराष्ट्र लाईव्ह न्युज या मध्ये बातमी प्रकाशित होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर मात्र दि. २४ शुक्रवार रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी भ्रमणध्वनीद्वारे अशी माहिती दिली, लाकडांने भरलेला ट्रक जवळ वनरक्षक शरद चेके हे एकटे होते ट्रक चालकाने गाडी साईडला घेतो असे सांगून अंधाराचा फायदा घेत ट्रक घेऊन पसार झाला. त्याबाबत फर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासंदर्भात कर्मचारी गेले परंतु मुद्देमाल किंवा फोटो नसल्याने त्यांनी तक्रार घेतली नाही. तसेच आपण माहिती घेऊनच बातमी टाकावी असे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी सांगितले. यासंदर्भात फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, त्यांचा वेगळा गुन्हा असतो त्याचा आपल्याकडे काही सबंध नसतो. त्यामुळे काही दाखल नाही. असे सपोनि साबळे यांनी सांगितले. जागरूक नागरिक व वृक्षप्रेमींनी सोयगाव वनविभागास वेळोवेळी गोपनीय माहिती देत ट्रक पकडण्यात मदत केली परंतु आर्थिक देवाणघेवाणीतून लाकडाने भरलेला ट्रक पसार करण्यास सोयगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यानेच मदत केल्याचा आरोप भाजपचे सुनिल गावंडे व मंगेश सोहनी यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबन करण्यात यावे यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



