दिवाळीच्या दहा दिवसात ३८ बसेसच्या माध्यमातून ४६ लाख २४ हजार १९४ रु कमाई. मराठवाड्यात सोयगाव आगार प्रथम.

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) सोयगाव एसटी आगारास दिवाळीच्या दहा दिवसात ४६ लाख रुपयाचे अधिकचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे सोयगाव आगाराने मराठवाडा विभागातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. मराठवाड्यातील ४७ आगारात सोयगाव आगार प्रथम आले आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढल्याने आगार प्रमुख मनिष जवळीकर यांनी समाधान व्यक्त केले. सोयगाव आगाराच्या वतीने १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत ३८ बसेस च्या माध्यमातून ज्यादा व नियमित फेऱ्या चालविण्यात आल्या. या दहा दिवसात १ लाख १० हजार ३३२ किलोमीटर झाले. यात १ लाख ४० हजार ९७१ प्रवाशांनी केलेल्या प्रवासातून आगारास ४६ लाख २४ हजार १९४ रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. कमी अंतरात अधिक उत्पन्न या निकषांवर मराठवाडा विभागातील ४७ आगारांमधून सोयगाव आगाराने प्रथम क्रमांक मिळविला. दिवाळी असल्याकारणाने शाळांना सुट्टया होत्या म्हणून दररोज शाळेसाठी पाच बसेस च्या पाच फेऱ्या कराव्या लागत असत. परंतु सुट्ट्यांचा आगाराने फायदा घेत या बसेस नाशिक, पुणे, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर अशा मार्गावर पाठवून मोठ्या प्रमाणात जादा फेऱ्या करून घेतल्या. त्यामुळे आगारास चांगले उत्पन्न मिळाले.
मराठवाड्यातील ४७ आगारांमधून सोयगाव आगाराने बाजी मारली आहे केवळ ३८ बसेस वर नियमित व अतिरिक्त जादा फेऱ्या करून कमी किलोमीटर मध्ये सोयगाव आगाराने हा विक्रम केला आहे. यापूर्वीही सोयगाव आगारचा २००८ मध्ये राज्यात प्रथम २०२३ मध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सोयगाव आगाराने २०२४ मध्ये मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सोयगाव आगार फॉर्मात : मराठवाडा विभागातील ४७ आगारांपैकी १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत प्रवासी भार नियमन व उत्पन्नात सोयगाव आगाराने प्रथम, सिल्लोड आगाराने द्वितीय तर वैजापूर आगाराने तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. सोयगाव आगारचा कर्मचाऱ्यांची अहोरात्र मेहनत महत्वपूर्ण ठरली असून ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये व आगाराच्या बसेस उभ्या राहू नये म्हणून चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या रजा गोठवून ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अहोरात्र मेहनत घेतली व आगारास जास्तीचे उत्पन्न मिळाले. या मुळे सोयगाव आगारास प्रथम क्रमांक आहे. याकामी आगार प्रमुख मनीष जवळीकर, वाहतूक निरीक्षक सतीश अंभोरे, ए. बी. काकडे, के. बी. बागुल आदींनी पुढाकार घेतला होता.



