तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील संगणकाचा पुन्हा अज्ञाताकडून वापर, तहसिलची सुरक्षा रामभरोसे.

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) सोयगाव तहसील कार्यालयास शासकीय सुट्टी असताना देखील अनोळखी इसमाने तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या संगणकाचा वापर करीत असल्याचा धक्कादायक प्रकार दि. १९ शनिवारी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यावर महसूल विभाग काय कार्यवाही करतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. १९ शनिवार असल्याने शासकीय सुट्टी असतांना अधिकारी कोणीही कार्यालयात नसताना काही अनोळखी इसम पुरवठा विभागात तहसील कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून संगणकाचा वापर करीत असल्याचे दिसून आले. पुरवठा विभाग म्हणजे तालुक्यातील नागरिकांची संपूर्ण माहिती असलेल्या संगणकावर अनोळखी इसम वापर करून काम करतो त्यानी काय काम केले हे मात्र अनुउत्तरीत आहे. या अगोदर दि. २८ आगस्ट रोजी एका शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याने निवडणूक विभागाच्या डीएससी चा वापर केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावर अद्याप पर्यंत तहसीलदार यांनी कोणतेही कारवाई केली नसल्याने आज पुन्हा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अनोळखी इसमाने संगणकाचा वापर केला असून त्यावर कारवाई होईल कि नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
दि. २८ ऑगस्ट रोजी निवडणूक विभागाच्या संगणकाचा राजकीय नेत्याच्या सस्थेतील कर्मचाऱ्याने वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तहसीलदार मनीषा मेने यांच्याकडे लेखी तक्रार करून देखील कार्यवाही करण्यात आली नाही. तोंडी सूचना देण्यात आल्याचा आव तहसिलदार आणत आहे. त्यामुळे तहसीलदारस या प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याची चर्चा तहसिल कार्यालयाच्या परिसरात रंगली होती. आचारसंहिता असताना देखील दि. १९ शनिवारी घडलेल्या घटनेची चौकशी करून तहसीलदार कार्यवाही करणार की तिलांजली देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



