आपला जिल्हा

ठेकेदाराच्या हुकुमशाही मुळे वाहनधारकांना करावी लागते जीवघेणी कसरत.

रस्ता पोखरून त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याने रस्ता झाला चिखलमय.

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) नागद – सोयगाव – फर्दापूर या राज्य महामार्ग क्रमांक २४ चे रस्ता नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामा दरम्यान पर्यायी रस्त्याने ठेकेदाराने भाडेतत्त्वावर लावलेले हायवा ओव्हर लोड गौण खनिज वाहतूक करीत असल्याने मोठमोठे खड्डेमय व चिखलमय झाला असून ठेकेदार याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना छोटे अपघात होत असल्याने या रस्त्याने ये – जा करतांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, नागद  – बनोटी – सोयगाव – फर्दापूर या ६० किमी अंतर असलेल्या राज्यमार्ग क्रमांक २४ चे नूतनीकरणाचे काम सुरू असून नागद कडून कामास सुरुवात करण्यात आली आहे. एका बाजूने काम करणे व दुसरी बाजू ही रहदारी साठी सुरळीत करून देणे हे ठेकेदाराचे काम आहे. मात्र वडगाव तिग्जी जवळ पूर्ण रस्ता पोखरून त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याने पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल होत असून दुचाकीस्वारांना प्रवास करतांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. दुचाकी स्लिप होऊन अपघात झाले आहे. किरकोळ दुखापत वगळता सुदैवाने कोणतीही अपरिहार्य घटना घडली नाही. मात्र अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. बनोटी – वरठाण दरम्यान असलेला रस्ता मुरूम टाकून रस्त्याची दबाई न करता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून ठेकेदाराने भाडेतत्त्वावर गौण खनिज वाहतुकीसाठी लावण्यात आलेल्या हायवा या ओव्हर लोड गौण खनिज व इतर रस्त्यासाठी आवश्यक असलेले मटेरियल वाहतूक करीत असल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालविताना जीवघेणी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ठेकेदारास समज देत वाहतुकीसाठी चांगल्याप्रकारे रस्ता करावा. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास ठेकेदारासह संबंधित रस्त्याची देखभाल करणाऱ्या शासकीय अभियंत्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाहतूकदार व नागरिकांकडून केली जाईल असे प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी सांगितले.

Related Articles

Back to top button