क्राईम

विहीरीत पडून बिबट्याचा मृत्यू – सोयगाव तालुक्यातील घटना.

वनविभागाने दिलेली माहिती व प्रत्यक्ष घटनास्थळ यावरून बिबट्याच्या मृत्यू बाबत संभ्रम.

वन्यप्राणी प्रेमींमधून संताप.

सोयगाव दि. ०६ (वृत्तसेवा) तालुक्यातील रावेरी शिवारात शेतातील विहिरीत पडून मादी बिबट्याचा (वय २वर्षे) मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.०६) दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    या बाबत सविस्तर माहिती अशी, रावेरी शिवारातील शेतात विहिरीत बिबट्या मृता अवस्थेत असल्याची वार्ता रावेरी, कंकराळा, सोयगावात वाऱ्या सारखी पसरताच वनविभाग खडबडून जागे झाला होता मात्र वनविभागाच्या पथकाला घटनास्थळ शोध घेऊनही सापडले नव्हते. अखेरीस ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाला दुपारी उशिरा तीन वाजता घटनास्थळ सापडल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने मृतावस्थेतील बिबटयास सहा वाजेच्या दरम्यान विहिरी बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले होते. दरम्यान विहीरीत मृत आढळलेला बिबट्या हा उभ्या अवस्थेत आढळून आल्या मुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विहीरीतील मृत बिबट्या बाहेर काढूनघटनेचा  पंचनामा केला. वनविभागाचे पथक रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते पानवडोद (ता. सिल्लोड) वरून पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिषेख खडसे यांना मृत बिबट्याच्या शवविच्छेदन साठी पाचारण करण्यात आले रात्री उशिरा घटनास्थळीच मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभागाने अंत्यसंस्कार केले.

  दरम्यान मौजे रावेरी शिवारातील शेतकरी दिलीप हरी भावसार यांच्या मालकीच्या गट क्रमांक ०७ लगत कठडा नसलेल्या व पाण्याने भरलेल्या पडीक विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता सदरील विहिरीत मोटार असून त्याचा शेतातील पिकास पाणीपुरवठा करण्यासाठी वापर केला जात असल्याचे उघडकीस आल्याने वनविभागाने दिलेल्या माहितीमुळे बिबट्याच्या मृत्यू प्रकरणी संभ्रम निर्माण झाला आहे. तालुक्यातील तिसरी घटना असून यात पाच बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला आहे तर विहिरीत पडून तीन रोहीचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या मृत्यू प्रमाण वाढते असल्याने वनविभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे वन्यप्राणी प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.

विहिरीत पाण्यात बुडून मृत झालेल्या मादी बिबट्याचे शवविच्छेदन केले असता सस्पेक्टेड नसल्यामुळे व्हिसेरा न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवायचा किंवा नाही हा आमचा अधिकार असल्याने व्हिसेरा प्रयोग शाळेत पाठवला नाही. डॉ. अभिषेक खडसे, पशुधन विकास अधिकारी पानवदोड.

Related Articles

Back to top button