जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या ४१ गावांतील नागरिकांसह गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.
सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या दहा उपकेंद्रातील ४१ गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून उपकेंद्राच्या इमारती बांधण्यात आल्या असून उपकेंद्राच्या ठिकाणी कुणीही राहत नसल्याने ओसाड पडल्या आहे. काही ठिकाणी उपकेंद्र परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य कर्मचारी स्थानिक ठिकाणी न राहता ये – जा करीत आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या घोसला, निंबायती, जरंडी, कंकराळा, आमखेडा, सोयगाव, पळसखेडा, वरखेडी बु||, फर्दापूर व सावरखेडा या १० उपकेंद्रासाठी १० आरोग्यसेवक व पाच आरोग्यसेविका कार्यरत असून स्थानिक ठिकाणी आरोग्य कर्मचारी राहत नसल्याने जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ४१ गावातील नागरिकांसह गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भाग असल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांची आरोग्याची धुरा आरोग्यसेवक व आरोग्यसेविका यांच्यावर अवलंबून आहे. मात्र आरोग्य कर्मचारी हे लसीकरणा पुरतेच गावात दिसतात इतर दिवस गावात येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी मनमानी कारभार करीत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून आरोग्य उपकेंद्राच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही उपकेंद्राच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



