आता ‘सीएम श्री’ शाळा:-सोयगाव तालुक्यात शिक्षण विभागाकडून पाच शाळांचा प्रस्ताव सादर..

सोयगाव दि. ०१ (वृत्तसेवा) शासनाच्या वतीने सोयगाव तालुक्यात ‘पीएम श्री’ शाळांपाठोपाठ आता ‘सीएम श्री’ शाळा योजना राबविली जात आहे. यासाठी सोयगाव तालुक्यातील पाच शाळांचे प्रस्ताव शनिवारी शासन दरबारी पाठविण्यात आल्या ची माहिती गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांनी दिली याअंतर्गत या शाळांत दर्जेदार भौतिक, शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पाच आताशाळा ‘सीएम श्री’ साठी प्रस्तावित करण्यात आल्या असून, ११८२ विद्यार्थी ‘सीएम श्री’ शाळांच्या स्मार्ट क्लासरूममध्ये शिकणार आहेत.
शासनाच्या वतीने २०२२ मध्ये ‘पीएम श्री’ शाळा योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अँडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली जात असून, पाच वर्षाच्या प्रकल्पात टप्प्या-टप्प्यात कामे केली जात आहेत. यात नवीन इमारत, शाळेसाठी क्रीडांगण, व्हीसीआर हेडसेट, बहुभाषिक पेन ट्रान्सलेटर, व्हिडीओ रेकॉर्डिंग लॅब, बसण्यासाठी चांगली व्यवस्था यासह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच धर्तीवर आता राज्य शासनाच्या वतीनेही ‘सीएम श्री’ शाळांची निर्मिती केली जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक पत्र तालुका शिक्षण विभागाला दिले आहे. त्यानुसार सोयगाव तालुक्यातील पाच शाळा ‘सीएम श्री’ साठी प्रस्तावित केल्या आहेत.
तालुक्यातील तीन शाळांची यापूर्वीच ‘पीएमश्री’ शाळांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यात सोयगाव, बनोटी आणि जरंडी केंद्रातील तीन शाळांचा समावेश आहे
११८२ विद्यार्थी स्मार्ट क्लासरूममध्ये गिरवणार धडे
दरम्यान या योजनेत सोयगाव तालुक्यातील बनोटी, जरंडी, देव्हारी, निंभोरा, बोरमाळ तांडा या पाच शाळांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून ११८२ विद्यार्थी आता स्मार्ट क्लास रूम मध्ये धडे गिरविणार आहेत.
दरम्यान या योजनेत ‘पीएम श्री’ शाळांसाठी यापूर्वी निवड झालेल्या शाळांची ‘सीएम श्री’ शाळेसाठी निवड होणार नाही. सोबतच आदर्श शाळांचीही निवड ‘सीएम श्री’ साठी केली जाणार नाही. त्यामुळे वरील दोन प्रकारच्या शाळा वगळून पाच शाळांचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
निवड होणाऱ्या शाळांसाठी दळणवळणाची सुविधा असावी, शाळेत भौतिक सुविधा विकसित करण्यासाठी पुरेशी जागा असावी, शाळेत पुरेशी विद्यार्थी संख्या असावी, ‘सीएम श्री’ शाळा म्हणून विकसित केल्यानंतर परिसरातील गावांतून विद्यार्थी येऊ शकतील याचा आराखडा द्यावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या मुलांना दर्जेदार सोयी – सुविधा मिळाव्यात, मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा, शाळास्तरावर विद्यार्थी, शिक्षकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविले जावेत आदी उद्देशाने ‘सीएम श्री’ शाळा अभियान राबविले जात आहे.
या शाळांमध्ये बालवाटिका, स्मार्ट क्लासरूम, तज्ज्ञ शिक्षक, पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण यासह इतर आवश्यक त्या सोयी – सुविधा मुलांसह शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
“शासन निर्देशानुसार सोयगाव तालुक्यातील पाच शाळांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या सूचनांनुसार शाळांमध्ये कामे केली जाणार आहेत. सीएम श्री शाळांत मुलांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध राहणार आहेत.”
रंगनाथ आढाव, गट शिक्षणाधिकारी, सोयगाव…



