राजकीय

ग्रामपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाकडे लक्ष !

सोयगाव दि. २० (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येत असल्याने तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, आता तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समित्यांच्या गणांचा आरक्षण सोडतीकडे इच्छुकांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून, प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रियाही सुरू झाली आहे. २१ जुलै ही आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असून, त्यानंतर आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि पक्षांचे स्थानिक नेते मोर्चेबांधणी, प्रचाराची रणनीती, कार्यकर्त्यांची बैठक अशा तयारीत व्यस्त झाले आहेत. या निवडणुका अनेक राजकीय दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहेत. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित ,बसप, यांच्यासह सर्वच पक्षांकडून आतापासूनच मोर्चेबांधणीवर भर दिला जात आहे. यंदाची निवडणूक चुरशीची व राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणार आहे.
नुकत्याच तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, आता अनेकांच्या नजरा जिल्हा परिषद व पंचायात समितीच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. तर ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागात स्थानिक पुढाकाऱ्यांकडून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने सोयगाव तालुक्यात राजकीय हालचालींना गती मिळाली असून, विविध राजकीय पक्षांच्या बैठका मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत. निवडणुकीपूर्वीची रणनीती ठरवणे, इच्छुकांची चाचपणी, संभाव्य उमेदवारांची चर्चा आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यासाठी पक्ष कार्यालयांमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

सर्वच गट व गण ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत.

तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांतील जागांच्या आरक्षणाची प्रतीक्षा सध्या अनेक इच्छुक उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचे केंद्रबिंदू आहे. या आरक्षणावर अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने त्यांच्यासह स्थानिक नेत्यांचेही याकडे बारकाईने लक्ष आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी अंतर्गत बैठकांचे सत्र सुरू केले आहे..

Related Articles

Back to top button