सोयगाव महसुल विभाग अर्थपुर्ण निद्रा अवस्थेत. जिल्हा अधिकारी यांनी दिलेला आदेश पायंदळी.
महसूल व पोलिस प्रशासनाचे वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध.

सोयगाव दि. १३ (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात सर्रास गौनखनिज चोरटी वाहतूक जोमात सुरू असून तहसीलदार मनिषा मेने – जोगदंड, महसुल भरारी पथक प्रमुख, निवासी तहसीलदार व गौनखनिज प्रतिबंधात्मक पथक कोमात असे चित्र सोयगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. हायवा व ट्रॅक्टर द्वारे गौण खनिज चोरटी वाहतूक सुरू असून शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी वाळू चे साठे आहेत परंतु तलाठी, मंडळ अधिकारी हे कारवाई करण्यास धजावत नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, महसूल चे गौण खनिज प्रतिबंधात्मक पथक कारवाई करीत नसल्याने सोयगाव सह तालुक्यात गौण खनिज चोरटी वाहतूक फोफावल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने महसुलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात होता. मार्च अखेर का होईना गौण खनिज प्रतिबंधित पथकास सूर गवसला व दि. २५ मार्च मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सापळा रचून चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडून महसूल ने कारवाई केली. मात्र चोरट्या गौण खनिज वाहतुकीला आळा तर बसला नाही उलट गौण खनिज चोरटी वाहतूकी मध्ये वाढ झाली असून दिवस रात्र वाहतूक सुरू आहे. तहसिल कार्यालयासमोरुन गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात आहे. सोयगाव पोलीसानी वडगाव तिगजी येथे दि. २२ जानेवारी रोजी चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक एम. एच. – १८ बी. जी. – ५२७७ यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महसूल विभागाने दि. २५ मार्च रोजी चोरटी वाहतूक करणाऱ्या टाटा हायवा ट्रक (क्रमांक एम. एच. २० ई. सी. १७७३) वर दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाई नंतर महसूल व सोयगाव पोलिसांनी चोरटी गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यास फुल स्टॉप मारल्याने चोरटी गौण खनिज वाहतूक करणारे जोमात तर हात ओले असल्याने महसूल विभाग कोमात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
सिल्लोड येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेला महसूल सहाय्यक वर्ग – ३ (अनधिकृत गौण खनिज उत्खनन/वाहतूक कार्यवाही पथक) दि. २५ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने चोरटी वाळू वाहतूक करणारा कडून २०,००० रु. हप्ता घेत असतांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर संबधित कर्मचारी यांची सोयगाव तहसिल कार्यालयात बदली करण्यात आली. गौण खनिजात तरबेज असलेला कर्मचाऱ्याची बनोटी सर्कल कडील तर काही माफियांचे शिपाई, कोतवाल व झिरो कडून चोरटी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या माफियांकडून महसूलचे हप्ते वसूल करीत असल्याची चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
महसुल व पोलिस अधिकाऱ्यांचे वाळूमाफियांशी अर्थपूर्ण हितसंबंध.
महसुल व पोलिस यंत्रणा यांनी वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध जोपासत वाळू माफियांना संमती दिली आहे. महसुल अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीय माहीती दिली तर कोणतेही अधिकारी व कर्मचारी येत नाही तर पोलिस प्रशासनाला माहीती दिली तर ते सांगतात की गौणगनिज शी आमचा संबंध नाही, महसुल व पोलिस यंत्रणा यांनी वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने सोयगाव तालुक्यात चोरटी वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.



