रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी सोयगाव परिसरात पावसाचे पुनरागमन, शेतकरी सुखावला.

सोयगाव दि. ०४ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यात व परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून गायब झालेल्या पावसाने शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी सलग पाच तास झालेल्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, जमिनीला आवश्यक ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सोयगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. पेरणी झालेली अनेक पिके पाण्याअभावी कोमेजली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे कपाशी, मका, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, यांसारख्या खरीप पिकांची वाढ पुन्हा जोमाने होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत आहे.पेरणी झालेली पिके पाण्याअभावी कोमेजली होती. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे.पावसाअभावी पिके सुकू लागली होती. फुलगळतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. महागडी बी-बियाणे आणि खते वापरून पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील आठवड्यात सावळदबारा येथील शेतकऱ्याने चार एकर सोयाबीन पीक अळीचा प्रादुर्भाव व पावसाअभावी ट्रॅक्टर फिरविला होता.
पावसामुळे खरीप पिकांची खुंटलेली वाढ होण्याची आशा आहे. या पावसामुळे केवळ पिकांनाच नाही, तर शेतकऱ्यांच्या मानसिकतेलाही मोठा आधार मिळाला आहे. रमेश गुंडीले, तालुका कृषी अधिकारी, सोयगाव



