‘‘वरुणराजा, बस झालं रे आता!’ — अवकाळी पावसाने शेतकरी हैराण.
सोयगावात पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ; खरीप पिकांचे मोठे नुकसान.

सोयगाव दि. २८ (वृत्तसेवा) ‘वरुणराजा, बस झालं रे आता…’ अशा शब्दांत नागरिकांनी समाजमाध्यमांवर आपला त्रागा व्यक्त केला आहे. कारण, गेल्या पाच दिवसांपासून सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर सुरूच असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
गेल्या शुक्रवारी (दि. २४) पासून सुरू झालेल्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मका आणि उडीद ही पिके अक्षरशः पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच तालुक्यातील सर्व मोठी व लहान धरणे तुडुंब भरली होती. यंदा १०७ टक्के एवढा विक्रमी पाऊस झाल्याची अधिकृत नोंद आहे. तरीसुद्धा, परतीच्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पावसाने तालुक्याला झोडपल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
शहरात पाणीच पाणी
सोयगाव शहरासह परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मंगळवारी (दि. २८) आठवडे बाजाराच्या दिवशी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने बाजारपेठेत पाणी शिरले. विक्रेत्यांना आपला माल वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली होती.
शेतकऱ्यांचे दुहेरी संकट
एकीकडे खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात उभ्या पिकांचे नुकसान होत असताना, दुसरीकडे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना जमिनी तयार करता येत नाहीत. त्यामुळे दुहेरी संकट ओढवले आहे.
शेतकरी वर्गाचा प्रश्न असा आहे की, आधीच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांची भरपाई अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाल्याने संकट दुप्पट झाले आहे.
हवामान विभागाचे अंदाज फोल.
हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच मान्सून परतल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी काही दिवसांत हलक्या सरींची शक्यता वर्तवली जात आहे.
नेटकऱ्यांचा उद्रेक..
समाजमाध्यमांवर नागरिकांनी ‘बस झालं रे वरुणराजा’, ‘आता सूर्यदर्शन होऊ दे’ अशा प्रतिक्रिया देत पावसावर विनोदी टीका केली. तर काहींनी ‘धरणे भरली, पण शेतकरी रिकामा झाला’ अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.



