महाराष्ट्रशेती

सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात ढगफुटी सदृश्य पावसाने कहर.

खटकाळी नदीच्या पुराच्या पाण्यात ७५ शेतकऱ्यांची शेती वाहून; तहसीलदार व लोकप्रतिनिधींवर दुर्लक्ष केल्याचा आरोप.

सोयगाव दि. १८ (वृत्तसेवा) तालुक्यातील अजिंठा डोंगररांगेत सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घोसला, निमखेडी, जरंडी परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. खटकाळी नदीने रौद्रावतार धारण करत घोसला शिवारातील तब्बल ७५ शेतकऱ्यांची शेती व उभी पिके पुरासह वाहून नेली. तसेच जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने पुराचे पाणी शिवारात घुसले. यामुळे निमखेडी शिवारातील जवळपास ६०० एकरवरील कपाशीची पिके पूर्णतः वाहून गेली. घोसला शिवारातील गट क्रमांक १८२, १८५, १८३ या क्षेत्रातील शेतकरी शांताराम पिंगळे, निलेश सोनार, सुधाकर युवरे, श्रावण युवरे आदींच्या शेतजमिनी पिकांसह खरडून वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पुराच्या पाण्यात जनावरांचेही बळी गेले. निमखेडी येथील शेतकरी अंकुश पांडे यांचा एक बैल व तीन शेळ्या, तसेच घोसला शिवारातील दीपक सुभाष गवळी यांची चार जनावरे वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे.

याबाबत शेतकरी निलेश सोनार यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “तहसीलदार केवळ दुरूनच पाहणी करतात, प्रत्यक्ष शेतात येऊन नुकसानाची माहिती घेत नाहीत. शेतकऱ्यांच्या झालेल्या हानीकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. गौणखनिज उत्खननावरून सर्रास वाहतूक सुरू असून, त्याकडेही प्रशासन डोळेझाक करत आहे. लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाहीत.”

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने त्यांचे जगणे संकटात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नुकसानीची पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Related Articles

Back to top button