सोयगाव परिसरात बाजरी जोमात, काही ठिकाणी फुलोऱ्यात.
सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील सोयगाव सह, गलवाडा, वेताळवाडी, आमखेडा, रावेरी, कंकराळा, माळेगाव, पिंपरी, जरंडी, धिंगा पूर, निंबायती, बहुलखेडा, कवली आदी परिसरात सध्या रब्बीच्या बाजरीचे पीक जोमात आले आहे. यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे बाजरीचे पीक हिरवेगार दिसत असून, त्यात आता दाणे भरायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी बाजरीचे पीक फुलोऱ्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
यंदा रब्बी हंगामात सोयगाव परिसरात पावूस झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत बाजरीची पेरणी केली होती. मात्र, खरिपात परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाली. परिणामी, खाण्यायोग्य बाजरीचे पीक निघाले नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रब्बी बाजरीची पेरणी केली. आता हे पीकही जोमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. काही भागात जंगली प्राणीही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या अनेक ठिकाणी पीक फुलोऱ्यात, हुरड्यात, तर काही ठिकाणी परिपक्व होऊन काढणीला आले आहे.
सोयगावसह परिसरात यावर्षी रब्बीच्या हंगामात बाजरीच्या पिकाची एक हजार ७८ हेक्टर वर पेरणी झालेली आहे. परिसरातील बाजरी सध्या जोमाने आहे त्यामुळे खरिपात उत्पन्न न मिळाल्याने आता रब्बीच्या हंगामात बाजरीची भाकरी मिळणार आहे.



