सोयगाव आगाराचे वेळापत्रक कोलमडले, हातमजुरीला जाणाऱ्या महिलांची पायपीट…
वाहतूक नियंत्रकाचे दुर्लक्ष....

सोयगाव दि. ०४ (वृत्तसेवा) सोयगाव आगाराची सोयगाव येथून हळदा, उंडणगाव मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी एम. एच. बी. टी. २०२५ ही बस अर्धा तास उशिरा आल्याने गलवाडा, वेताळवाडी या ठिकाणी शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पायपीट करावी लागली. वाहतूक नियंत्रक हे प्रवासी महिलांना उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आमखेडा, सोयगाव येथील नागरिकांची गलवाडा, वेताळवाडी शिवारात शेती आहे. शेतात काम करण्यासाठी आमखेडा, सोयगाव येथील शेतमजूर हे सोयगाव येथून सकाळी ०७:३० ला गलवाडा, हळदा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करीत गलवाडा, वेताळवाडी याठिकाणी दररोज कामाला जातात. दरम्यान दि. ०३ शनिवार रोजी सकाळी दहा ते पंधरा शेतमजूर महिला गलवाडा, वेताळवाडी या ठिकाणी कामासाठी जाण्यास सोयगाव बसस्थानकावर आल्या. वाहतूक नियंत्रक यांना बस केंव्हा लागेल विचारले असता थोडा वेळ लागेल, येतच आहे असे उत्तर देत पन्नास पंचवीस मिनिटे होऊन गेली. सोयगाव आगाराची स्थानिकांना खुबी माहीत असल्याने महिलांनी शेताकडे पायी मोर्चा वळविला. सकाळी ०७:३० सुटणारी बस सोयगाव बसस्थानकावर ०७:५५ ला आली व ०७: ५८ ला बस निघाली. मात्र वाहतूक नियंत्रक मिसाळ यांनी सोयगाव – छत्रपती संभाजीनगर बसची ०७:४५ असे नोंद केली. रोजनदारीवर काम करणाऱ्या महिलांना शेतात कामासाठी जाण्यास पायपीट करावी लागली. वाहतूक नियंत्रकाकडे योग्य माहिती नसल्याने बस बाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे द्यावे लागत आहे. सोयगाव बसस्थानकावर सूचना फलकावर बस फेरी रद्द झाली बाबत व इतर काही सूचना लिहिल्या जात नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष द्यावे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे. आगार प्रमुख बसगाड्या वेळेवर सोडतील याबाबत काय निर्णय घेतातहे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोयगाव आगारात कर्त्यव्यावर असलेले चालक – वाहक स्थानिक ठिकाणी न राहता ये-जा करीत असल्याने सोयगाव आगाराच्या सोयगाव – धुळे या बससह इतर बस गाड्या वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांना वेळे अभावी ताटकळत बसावे लागत आहे. काही वेळेस तर चालक – वाहक छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी खाजगी टपाल वाहन ची वाट पाहत बसतात कारण त्यातून काही पार्सल जरंडी, घोसला व बनोटी न्यावे लागते परंतु त्या (टपाल) पार्सल ची पास असते कि नाही हे मात्र गुलदस्त्यातच राहते. महिलांसाठी अर्धे भाडे, ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास असे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे परिवहन महामंडळाला सुगीचे दिवस आले आहेत. मात्र प्रवाशांचे समाधान करण्यास मात्र प्रत्यक्षात परिवहन महामंडळ अपयशी ठरत आहे.



