ता.दंडाधिकाऱ्याच्या पत्राला केराची टोपली दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला दंडाची रक्कम वसूल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश.

सोयगाव दि. ०६ (प्रतिनिधी) सोयगाव पोलीस प्रशासनाला चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर क्रमांक एमएच – १८ बीजी – ५२७७ च्या मालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दि. ०५ बुधवारी सोयगाव येथील आढावा बैठकीत दिल्याने गौनखनिज माफियांमध्ये खळबळ उडाली असून सपोनि पंकज बारवाल यांच्या कर्तृत्वावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तालुक्यातील वडगाव तिगजी येथे दि. २२ जानेवारी रोजी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या सोयगाव पोलिसांनी दहा टायरी डंपर एम. एच. – १८ बीजी – ५२७७ च्या चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डंपर मध्ये वाळू (गौनखनिज) असल्याने तहसीलदार सोयगाव यांना आपल्या स्तरावरून कारवाई करणे संबंधी दि. ०३ फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात आले होते. दरम्यान सोयगाव तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी दिलेल्या पत्रास सपोनि पंकज बारवाल यांनी केराची टोपली दाखवीत व अधिकाराचा गैरवापर करीत चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर दि. १२ बुधवारी न्यायालयाचे आदेश घेत असल्याचे सांगून सोडून दिले होते. यामुळे सोयगाव तहसिलचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपोनि पंकज बारवाल यांना चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकाकडून दंड वसूल करण्यासंदर्भात आदेश दिले आहे. पंकज बारवाल हे शासनाचा महसूल वसूल करण्यात यशस्वी होतात की जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवितात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



