मराठवाड्यातून महसुल बुडवून खानदेशात गौण खनिजाची वाहतूक, सुटीचा फायदा घेत गौण खनिजाची सर्रास लूट,
शेकडो ब्रास मुरूमाची परजिल्ह्यात वाहतूक, प्रशासन सुस्त माफिया मस्त.

सोयगाव दि. ०९ ( वृत्तसेवा ) सोयगाव महसूल व अजिंठा वन विभाग हद्दीतील कडेवडगाव तलावातून प्रशासनाच्या सुटीचा पुरेपूर फायदा घेत जळगाव जिह्यातील गौण खनिज माफियांनी दि. ०९ रविवारी भर दुपारी शासनाचा लाखो रुपयांचा महसुल चुकवित विना परवाना अवैधरीत्या दोन जेसीबी व सहा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेकडो ब्रास मुरुमाची परजिल्ह्यात वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रविवार सुट्टी असल्याने गौण खनिज माफियांनी याचा पुरेपूर फायदा घेत सोयगाव तहसीलच्या महसूल विभागा अंतर्गत तसेच वनक्षेत्रपाल कार्यालय सोयगावच्या अजिंठा डोंगराला लागून असलेल्या कडेवडगाव तलावात रविवारी भर दुपारी दोन जेसीबी व सहा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेकडो ब्रॉस गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करण्यात आली आहे. सुटीचा दिवस असल्याने जळगाव जिल्ह्यातील गौण खनिज माफिया सोयगाव तालुक्यात प्रकटले होते. कडेवडगाव जवळील अजिंठा डोंगर रांगेला लागून असलेल्या सोयगाव महसूल विभागाच्या अखत्यारीतील कडेवडगाव तलावात दोन जेसीबीच्या साहाय्याने मुरुमाचे उत्खनन करण्यात आले. व सहा ट्रॅक्टरद्वारे शेकडो ब्रास मुरुमाची अवैद्य विनापरवाना वाहतूक करण्यात आली. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. याप्रकरणी महसूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून या गौण खनिज माफीयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



