महाराष्ट्र

विद्यार्थ्यांवर एसटी चालकाची शिवीगाळ; बसमध्ये घेण्यास नकार — जामनेर आगारातील मुजोरपणामुळे संतापाचा भडका!

शिक्षणासाठी पास काढूनही बसमध्ये चढू न दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप; कर्मचाऱ्यानेच दिली धमकी — “बस बंद करतो!”

जळगाव दि. ३० (वृत्तसेवा) शिक्षण घेण्यासाठी रोज एसटीने प्रवास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार देत शिवीगाळ करणाऱ्या चालक-वाहकांचा प्रकार शेंदुर्णी बसस्थानकावर घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून जामनेर आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शेंदुर्णी बसस्थानकावर घडला धक्कादायक प्रकार

गुरुवारी सकाळी नऊ ते साडे नऊच्या सुमारास शेंदुर्णी बसस्थानकावर जामनेरला जाणारे विद्यार्थी नेहमीप्रमाणे उभे होते.
तेवढ्यात एम. एच. १४ बी. टी. ३९०८ ही एसटी बस स्थानकावर आली. विद्यार्थी दरवाज्याजवळ गेले असता बस चालकाने त्यांच्याकडे पाहतच ओरडत “भडव्यानो बाजूला व्हा, फक्त प्रवाशी बसतील!” अशी अश्लील शिवी दिली आणि बस निघून गेली. यानंतर आलेल्या एम. एच. १४ बी. टी. २२४२ या बसच्या वाहकानेही विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले.

गरीब घरातील विद्यार्थी त्रस्त

साहिल गुजर व त्याचे सहाध्यायी हे सर्वजण आय.टी.आय. (औद्योगिक प्रशिक्षण संस्था), जामनेर येथे तांत्रिक शिक्षण घेत आहेत.
घरची परिस्थिती हलकी असल्याने जामनेरमध्ये राहणे शक्य नसल्यामुळे ते दररोज शेंदुर्णीहून जामनेरपर्यंत एसटीने प्रवास करतात.
यासाठी त्यांनी परिवहन महामंडळाकडून अॅडव्हान्स पास काढला असून सर्व शुल्क वेळेवर भरले आहे.

तरीदेखील एसटी चालक व वाहक त्यांना वारंवार बसमध्ये घेण्यास नकार देत त्रास देत असल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.

तक्रार दिली तर बस बंद करण्याची धमकी!

या प्रकाराची लेखी तक्रार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व वाहतूक नियंत्रक, जळगाव यांना जामनेर आगार प्रमुखांच्या मार्फत देण्यासाठी विद्यार्थी निघाले असता,
एका कर्मचाऱ्याने त्यांना थांबवून “एसटीच्या भरवशावर शिक्षण घेताय, तुम्ही अर्ज दिलात तर सकाळची गाडी बंद करतो!” अशी धमकी दिल्याने विद्यार्थी भेदरले.

शिक्षणासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांशी असा वागणूक दिल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

🧾 विद्यार्थ्यांची सामूहिक तक्रार

या प्रकरणी साहिल गुजर, मयुर शिंदे, लोकेश माळी, समर्थ जोहरे, अक्षय चौधरी, रवि पाटील, ऋषिकेश गोंधळी, प्रथमेश सुतार, वैभव ढगे, निखिल पाटील व प्रशांत जोहरे या अकरा विद्यार्थ्यांनी स्वाक्षरीसह तक्रार अर्ज सादर केला आहे.

या संदर्भात विचारणा केली असता दिनेश नाईक, आगार प्रमुख, जामनेर यांनी सांगितले की,  “संबंधित चालक व वाहक यांची चौकशी करण्यात येईल. शहानिशा झाल्यानंतर निश्चित कारवाई होईल. तसेच सकाळच्या बसेस नेहमीप्रमाणे सुरू राहतील.”

🗣️ नागरिकांचा सवाल — विद्यार्थ्यांवरच अन्याय का?

संकटनमोचक मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातच असा प्रकार घडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
“विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वागवणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी,” अशी जनतेची मागणी होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका.