धनाच्या लालसेपोटी जंजाळा किल्ल्यात होत आहे उत्खनन, पुरातत्व विभाग झोपेत. तर वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष.
किल्ल्याची सुरक्षा रामभरोसे, कारवाई करणार कोण?

सोयगाव दि. २६ (वृत्तसेवा) सोयगाव शहरापासून पाच ते सहा किलो मीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध जंजाळा किल्ला ऐतिहासिक असून पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. अजिंठा डोंगररांगेत असलेला जंजाळा किल्लात पुरातन धनाच्या लालसेपोटी ठिकठिकाणी उत्खनन करण्यात आले असून भिंती सुद्धा पाडण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. २२ शुक्रवारी चार ते पाच दुचाकी वर जवळपास दहा ते बारा लोक काही साहित्य घेऊन संशयास्पदरित्या दुचाकी रावेरी शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी उभ्या करून जंजाळा किल्ल्याकडे पायी वाटेने गेल्याची गोपनीय माहीती वनविभागाला मिळताच वनविभागाचे वनरक्षक शरद चेके व वनमजुर रवि मोरे हे त्याठिकाणी पोहचण्या अगोदर त्याठिकाणांहून दोन दुचाकी सोयगावकडे परत आल्या. चेके व मोरे त्या ठिकाणी काही वेळ थांबले. व त्या ठिकाणाहून निघून गेले. सोयगावकडे आलेल्या दुचाकी पैकी एक दुचाकी अंभई (ता. सिल्लोड) नानेगाव मार्गे जंजाळा किल्ल्या पर्यंत गेल्याची माहिती मिळते.
या कालावधीत किल्ल्यात गेलेल्या दहा ते बारा लोकांपैकी चार जणांच्या पाठीवर गोण्या घेऊन सायंकाळी किल्ल्याकडून डोंगराच्या पायवाटेने दुचाकी ज्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या त्या ठिकानांकडे येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या पथक पोहचण्या अगोदर चार दुचाकी निघून गेल्या. शेवटी असलेली दुचाकीस्वारांना वनविभागाच्या पथकाने थांबवून चौकशी केल्यानंतर सोडून दिले. दरम्यान मशीनच्या साहाय्याने गुप्त धन शोधून तीन ठिकाणी उत्खनन करण्यात आले त्यात तीन लोखंडी पेट्या सापडल्याची चर्चा शनिवारी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही दुचाकीस्वारांची चौकशी केली असून ते पर्यटक होते. किल्ला पाहण्यासाठी आलेले होते. संबंधित इसमांकडे संशयरीत्या काही त्यांच्याकडे आढळून आले नाही. अनिल मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव.
पुरातत्व विभाग झोपेत
अजिंठा डोंगर रांगेत ऐतिहासिक ठेवा असलेल्या जंजाळा किल्ल्याच्या भिंती, बुरुज व दरवाजाच्या बाजूच्या भागांची पडझड झालेली असून काही ठिकाणी गुप्त धनाच्या शोधासाठी उत्खनन केलेले असल्याने पुरातत्व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक जंजाळा किल्ला औट घटका मोजत आहे. किल्ल्यावर येणाऱ्या व्यक्तींची नोंद घेत जात नसल्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरातत्व विभाग काय उपाययोजना करणार याकडे गडकिल्ले प्रेमींची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जंजाळा किल्ल्यात केलेल्या उत्खननाची माहिती घेऊन अज्ञाता विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. अमोल गोटे, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, छत्रपती संभाजीनगर.


