“तहसीलदार कुठं गायब?” — संतप्त शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर तुफान मोर्चा!
अतिवृष्टी भरपाई व पीकविमा न मिळाल्याने उफाळला संताप; तहसील कार्यालयाला कुलूप, अखेर पोलिस बंदोबस्तात तहसीलदार दाखल.

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) अतिवृष्टी व पीकविमा न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. २९) तहसील कार्यालयावर जोरदार धडक देत घोषणाबाजी केली. दुपारी उष्ण वातावरणात सुरू झालेल्या या आंदोलनाने तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसताच संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकले आणि “जोपर्यंत तहसीलदार स्वतः येऊन निवेदन स्वीकारत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत कार्यालयाबाहेर ठिय्या धरला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही अद्याप शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने दिवाळी अंधारात गेल्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये होता. दरम्यान, तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड कार्यालयात उपस्थित नसल्याने परिस्थिती आणखी चिघळली. नायब तहसीलदार चैनसुख बहुरे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आल्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तहसीलदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याची मागणी केली; मात्र तहसीलदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष अधिक वाढला.
यावेळी शेतकरी पूनम परदेशी यांनी बहुरे यांना गेल्या दोन दिवसांतील पावसाचे मोजमाप विचारले असता ते निरुत्तर झाले. तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, तसेच नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांची गैरहजेरी याविषयी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. “अवैधरित्या वाळू उत्खनन व हप्ते वसुली करणाऱ्यांना फोन केल्यावर प्रतिसाद मिळतो, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेला प्रतिसाद नाही,” अशी टीका शेतकऱ्यांनी केली.
सुमारे साडेचार तासांनंतर, दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड पोलिस बंदोबस्तात कार्यालयात दाखल झाल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई तातडीने बँक खात्यात वर्ग करण्याची, पीकविमा मंजूर करण्याची, कर्जमाफीबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा यासह पाच मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.
या आंदोलनात विजय काळे, रवींद्र काळे, ॲड. योगेश पाटील, बंटी काळे, राजू दुतोंडे, कृष्णा पाटील, अरुण सोहनी, पूनम परदेशी, पुंडलिक मानकर, अनिल चौधरी, अमोल मापारी, राजू बडक, नितीन पाटील, अजय नेरपगारे, भरत काळे, दिलीप चौधरी, संतोष बोडखे, किशोर मापारी, संतोष सोहनी, जितेंद्र चौधरी, रामा आगे, राजेंद्र पाटील, भागवत थोटे, विजय गव्हाड, महेश चौधरी, सुरेश मनगटे, शिवाजी चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
तहसील कार्यालय परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनी पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अजय कोळी, सादिक तडवी, राजू सोनवणे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील प्रशासनिक अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आता शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणते ठोस पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



