आपला जिल्हा

नामदारांच्या ताफ्यामुळे कंकराळा येथे वाहतुकीस अडथळा…

सोयगाव दि. २० (प्रतिनिधी) पणन व अल्पसंख्याक मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यातील गाड्या कंकराळा येथे भर रस्त्यावर उभ्या राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यावेळी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.

       याबाबत सविस्तर माहिती अशी, पणन व अल्पसंख्याक मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार हे दि. २० शुक्रवार रोजी विविध कामांचे उदघाटन करण्यासाठी सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या तर काही ठिकाणी कामाचे उदघाटन करण्यात आले. याच दरम्यान सोयगाव – बनोटी रस्त्यावरील कंकराळा येथे उपस्थित असतांना मंत्र्यांच्या ताफ्यातील शासकीय, निमशासकीय व पोलीस गाड्या भर रस्त्यात उभ्या करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. एरवी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला की सर्वसामान्य वाहनचालकांना दंड आकारून कार्यवाही करणारे पोलीस मात्र कायदाच वेशीवर टांगताना दिसून आले. कायदयाचे पालन करणारेच कायदा सत्तेपुढे कसा झुकतो हे दाखवत असल्याची चर्चा रंगली होती. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही या म्हणीचा प्रत्यय कंकराळा गावात मात्र दिसून आला.

Related Articles

Back to top button