आपला जिल्हामहाराष्ट्र

अवैध वाळू साठवण्यासाठी, माफियांचा ‘रात्रीस खेळ चाले’ एकावरही कारवाई नाही….

सोयगाव दि. २४ (प्रतिनिधी) सोयगाव – बनोटी रस्त्यावर हाकेच्या अंतरावर वाळू माफियांकडून मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठा करण्यात येत आहे. मात्र, वाळू माफियांच्या अवैध वाहतूक वाळू साठ्यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे सोयगाव परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा सुरू आहे. उल्लेखनीय बाब अशी की, पोलिस प्रशासन, महसूल विभागाच्या ‘हितसंबंधामुळे’ हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे.

शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक वाळू साठ्याचा गोरखधंदा सोयगाव तालुक्यात सध्या फोफावताना दिसत आहे. सोयगाव – बनोटी रस्त्याला लागून असणाऱ्या माळेगाव-पिंप्री फाटा जवळ होत असलेल्या जिनिंग समोरच मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या वाळू साठा पडून आहे. याठिकाणाहून दररोज अवैधरीत्या वाळूची मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची परिसरात चर्चा आहे. या ठिकाणाहून होत असलेल्या चोरट्या वाहतुकीकडे संबंधित महसूल विभाग, वाहतूक स्थानिक पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली दुर्लक्ष करत असल्यामुळे माफियांचे फावत आहे. परिणामी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवून नुकसान होत आहे. याच अवैध वाहनांच्या सुसाट वेगामुळे रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहे. विनाक्रमांक धावणाऱ्या हायवा ट्रकमधून ही चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे तसेच प्रशासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या ‘मधुर संबंधामुळे’ सर्वकाही सुरळीत सुरू असल्याची खंत परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

रात्रीस खेळ चाले….. : सोयगाव तालुक्यात वाळू पट्टे देखील नाही. तर जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सध्यावाळूपट्ट्यांचे लिलाव लालफितीत अडकल्यामुळे मागणीच्या तुलनेत वाळू उपलब्ध होत नाही. परिणामी वाळूचे भाव वाढले आहेत. याच संधीचा फायदा घेत वाळू माफिया प्रशासकीय कर्मचारी – अधिकारी तसेच पुढाऱ्यांना हाताशी धरून वाळू साठा करत मागणीनुसार वाळू विक्रीचा गोरखधंदा करत आहेत. त्यासाठी या माफियांनी रात्रीची वेळ निवडली आहे. रात्री उशिराने सुरू होणारा हा प्रवास पहाटेपर्यंत चालतो. त्यानंतर दिवसभरात लगतच्या नद्यांवर वाळू धुऊन स्वच्छ करण्याचे काम चालते. मात्र, इतर मंडळी (प्रशासकीय) जरी या प्रकरणांपासून ‘अनभिज्ञ’ असली तरी स्थानिक रहिवासी मात्र नक्कीच या प्रकरणापासून अनभिज्ञ नाहीत. नागरिकांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी माध्यमांकडे धाव घेऊन हे प्रकरण प्रकाश झोतात घेऊन येण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, माफियांचा पोलिस प्रशासनाचा ससेमिरा नको म्हणून त्यांनी नाव छापण्यास असमर्थता दाखवली. परिसरातील अनेक नागरिकांच्या मोबाइलमध्ये अवैध वाळू माफियांच्या गोरखधंद्याचे चित्रीकरण छायाचित्रे उपलब्ध असल्याचे नागरिक सांगतात.

जिनिंग परिसरात करतात वाळू साठा….
सोयगाव – बनोटी महामार्गावर असणाऱ्या प्रगती जिनिंग प्रेसिंग परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू साठा करण्यात आलेला आहे. तसेच कंकराळा पासून ते बनोटी रस्त्यालगत अनेक ठिकाणी पडीक मोकळी जमीन आहे, तर एका ठिकाणी जिनिंगच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात वाळू साठा पडून आहे. त्या ठिकाणी दि. २० सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार हे दौऱ्यावर असतांना आले होते. त्या दरम्यान तहसीलदार मनीषा मेने यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र त्यांनी या वाळू साठ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने चर्चा रंगली होती.

परवानगी घेतली नाही
वाळूसाठा करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अशा प्रकारची परवानगी परिसरात कोणीच घेतलेली नाही. त्यामुळे कागदपत्री जरी परवानगी नसेल तरी चिरीमिरी करीत महसूल विभागाने मूक संमती दिली असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button